मुंबई : ‘आज ते सांगत आहेत आम्ही सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. अडीच वर्षापूर्वीच हे झालं असतं, आज मनावर दगड ठेवून जे करावं लागलं आहे. तेव्हाच भाजपच्या कोणत्यातरी एखाद्या दगडाला शेंदूर लागला असता ना’, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय. आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते खासदार अरविंद सावंत यांच्या शिवसेना (Shivsena) शाखा क्रमांक 205 या शाखेचं लोकार्पण केलं. त्यावेळी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, बंडखोर आमदार (Rebel MLA) आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
‘जे गेले त्यांच्यासोबत एकही सच्चा शिवसैनिक गेला नाही. जिथे सत्ता असते तिथे शिवसैनिक येत नाही तर जिथे शिवसैनिक असतो तिथे सत्ता येते. जे गेले ते आता शिवसैनिकांच्या अशा गर्दीत मिसळून दाखवू शकतील का? पोलीस बंदोबस्त, ज्यांनी निवडून दिलं त्यांच्यापासून? ज्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवून, निखारे ठेवून तुम्हाला निवडून दिलं त्यांच्यात हे आता फिरू शकत नाहीत. त्यांना आता पोलीस प्रोटेक्शन लागतंय, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर टीका केली.
मुद्दाम एक गोष्ट तुम्हाला सांगायला होती, 2019 मध्ये आपले सगळे करार भाजपसोबत ठरले होते, त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली. आपलेही चांगले निवडून आले, भाजपची तर काय एकहाती सत्ता आली. तेव्हा मंत्रिपद नको म्हणत असताना आपल्या गळ्यात मारलं. त्यानंतर पाच सहा महिन्यात विधानसभा निवडणूक लागली. आज ते सांगत आहेत आम्ही सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. अडीच वर्षापूर्वीच हे झालं असतं, आज मनावर दगड ठेवून जे करावं लागलं आहे, तेव्हाच भाजपच्या कोणत्यातरी एखाद्या दगडाला शेंदूर लागला असता ना. आधी 50 – 50 टक्के सत्तेचं वाटप आणि मुख्यमंत्रीपद ठरलं होतं. अडीच वर्षे शिवसेनेचा, अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री. तेव्हा बंडखोर उभे केले, आपल्या जागा पाडल्या. तेव्हा शिवसेनेला मुख्यमंत्री देता येणार नाही म्हणत होते मग आता कसं संभव झालं? आता संभवामी युगे युगे कसं झालं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केलाय.
गेली बरेच दिवस अरविंद माझ्या मागे लागले होते की कार्यालयाचं उद्घाटन करायचं आहे. मी दुर्लक्ष करत होतो. पण हल्ली दिवस असे आहेत की आमदार, खासदार सांगतील ते ऐकावं लागतं. हल्ली कोण कुणासोबत हे कळतंच नाही. किती वादळं येतील, पाला पाचोळा झडून जाईल. पण शिवसेनेची मुळं अशीच घट्टं राहतील. जे गेले त्यांचा उल्लेख संपूर्ण जग गद्दार असा करत आहे. ते काल म्हणत होते आम्हाला गद्दार म्हणू नका. पण तुमच्या कपाळावरच तुम्ही आता हाताने शिक्का मारुन घेतलाय तो बोलतोय, अशी टीका ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर केलीय.