मुंबईः शिवसेनेतील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विरुद्ध उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील परस्पर विरोधी याचिकांवर सुप्रीम कोर्टात (Supreme court) सुनावणीला सुरुवात झाली आहे. आज न्यायमूर्तींसमोर दोन्ही पक्षांकडील वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. अवघ्या राज्याचच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष या खटल्याकडे लागलं आहे. एकिकडे कोर्टात सुनावणी सुरु असताना औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महत्त्वाचं भाकित वर्तवलं आहे. सुप्रीम कोर्टात कितीही युक्तिवाद झाले, कितीही लढाई झाली तरीही आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय शेवटी विधानसभा अध्यक्षांकडे येईल. तसेच खासदारांचा निर्णय लोकसभा अध्यक्षांकडे येईल आणि शिंदे गटातील आमदार आणि खासदार अखेर पात्र ठरतील. सुरक्षित राहतील, असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलंय. टीव्ही 9 शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
कोर्टातील सुनावणीवर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, ‘ न्यायव्यवस्थेवर आणि घटनेवर विश्वास आहे. विधानसभा आणि विधानसभेचा अध्यक्ष अपात्रतेसंबंधी निर्णय घेते. पण सुप्रीम कोर्टाने स्वतः असे निर्णय घेतलेले मी पाहिलेले नाही. विधानसभा अस्तित्वात असताना त्यांनी 40 लोकांच्या गटाला मान्यता दिली. 15 लोक 40 लोकांच्या गटाला काढून टाकू लागले, यात काही लॉजिक आहे का… शेवटी खंडपीठाकडे वर्ग केला तरीही शेवटचा चेंडू विधानसभेच्या अध्यक्षांकडे येणार. खासदारांचा प्रश्न लोकसभेच्या अध्यक्षांकडे येणार. विधानसभेचे काही प्रमुख आहेत. त्यांना कारवाईच्या पद्धतीत काही नियमात चूक आढळल्यास कोर्टात जाता येईल. त्यामुळे आम्ही सुरक्षित असणार. सुप्रीम कोर्टाचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल.
उदय सामंत यांच्यावरील हल्ल्यावर अब्दुल सत्तारांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ कोर्टाची लढाई तिथेच लढायला पाहिजे. अशा प्रकारचे भ्याड हल्ले घडू नयेत, याची काळजी त्यांच्या पक्षातील नेत्यांनी घ्यावी. त्यानंतरही असे दुर्दैवी प्रकार घडतच राहिले तर नाईलाजाने मुख्यमंत्री यांना मानणारा एक वर्ग आहे. तो वर्ग बिथरला तर याचे परिणाम भोगावे लागतील .कारण त्या नेत्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली पाहिजे…
हिंगोलीचे शिवसेना नेते बबनराव थोरात यांनीदेखील काल एक वक्तव्य केलं. गद्दारांच्या गाड्या फोडेल त्याचा सत्कार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केला जाईल, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. यावर प्रतिक्रिया देताना अब्दुल सत्तार म्हणाले, अशा पद्धतीचं चिथावणीखोर यांनी बोलावं आणि काही माथेफिरूंनी घटना करायची आणि त्यानंतर त्यांना सन्मान उद्धव ठाकरे करतील तर हे दुर्दैव आहे. बबन थोरात यांना आधी अटक करायला पाहिजे. त्यांनी ही चिथावणीखोर भाषण करण्याची पार्श्वभूमी काय, हे पहायला पाहिजे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिसाद वाढतोय का, यावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, जनसामान्य माणसांना त्यांच्याबद्दल आपुलकी आहे. त्यांच्यावर प्रेम आहे. शिंदे यांनी केलेला ३३ दिवसांचा प्रवास. घेतलेले निर्णय, शेतकरी असो वा पाण्याचा निर्णय असेल. अनेक विकासाची कामं दोन वर्षांपासून थांबली होती, त्यांना चालना दिली…
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावाच्या पाठिशी लोक आहेत.
शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळेल, असं भाकितही सत्तारांनी केलं. ते म्हणाले, ‘ रिक्षावाला, वॉचमन, पानटपरीवाला मोठं व्हावं, असं यांना वाटत नाही. सोन्याच्या चमच्यांनी दूध पिणाऱ्यांनाच मोठं करावं वाटतं. लाखो-करोडो लोक ज्यांच्या पाठिशी आहेत. त्यांच्याविरोधात हे बोलत असतील तर पुढची लढाई आणखी कठोर होईल. शिवसेनेचं चिन्ह एकनाथ शिंदेंनाच मिळेल. ते नाही मिळालं तरी काही दिवसांसाठी ते गोठवलं जाऊ शकेल. काही काळानंतर ते आम्हालाच मिळेल. निवडणुकीत आमच्या आमदार-खासदारांच्या आणि त्यांच्या नेत्यांना मिळालेल्या मतांचं मूल्यमापन निवडणूक आयोग करेल, त्यानंतर हे चिन्ह आम्हाला मिळेल.