मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना पुन्हा एखाद्या खोट्या प्रकरणात गोवलं जाऊ शकतं, अशी भीती व्यक्त केली आहे. ते मातोश्रीवर (Matoshree) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. संजय राऊत यांनी जामीन मिळाल्यानंतर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने संजय राऊत यांनी अटक केली होती. तब्बल 102 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर संजय राऊत यांनी अखेर बुधवारी जामीन मिळाला होता. बुधवारीच संजय राऊत यांची आर्थर रोड जेलमधून सुटका झाली होती. दरम्यान, कालच ते उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता होती. मात्र त्यांनी अखेर आज दुपारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं की,…
केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून अनेक पक्ष फोडले गेले, अनेक पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जातोय. बेकायदेशीर अटक केली जातेय. खोटे गुन्हे दाखल केले जात आहे.
हे सुद्धा वाचाकालचा दणका न्यायालयाने केंद्राला दिल्यावरही कदाचित कुठल्या तरी खोट्या केसेसमध्ये परत संजयला गोवण्याचा प्रयत्न होऊ शकेल.
हायकोर्टाने संजय राऊत यांची अटक बेकायदेशी असल्याचं परखड निरीक्षण बुधवारी नोंदवलं होतं. यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, एवढ्या चपराकी लाज वाटण्यासारख्या आहेत. हे (भाजपचं सरकार) केंद्रात सरकार नसतं तर अशा घटना घडल्या नसत्या. कर नाही त्याला डर कशाला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना यावेळी सुनावलंय.
संजय राऊत यांना गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी गोवण्यात आलं असल्याचा आरोप याआधीही शिवसेनेकडून करण्यात आला होता. फक्त ईडीच नव्हे तर वेगवेगळ्या केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही राऊतांनी वेळोवेळी केला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा उद्ध ठाकरे आणि संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधलाय.
घाबरुन पक्षातून काही लोकं पळून गेले. त्यांनाही हा मोठा धडा आहे. न्यायालयं निष्पक्षपातीपणे निर्णय देत आहे, ही चांगली गोष्ट आहे, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.