मुंबई : काँग्रेससोबत बैठक झाली, चर्चा योग्य दिशेने सुरु आहे, निर्णय लवकरच कळेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना दिली. काँग्रेस नेत्यांसोबत आज उद्धव ठाकरे यांची हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक होती. 55 मिनिटे चाललेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. किमान समान कार्यक्रम असावा असं काँग्रेस-राष्ट्रवादीने पूर्वीपासूनच म्हटलं आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांनी समन्वय समितीसाठी 5-5 जणांची नावं निश्चित केली आहेत. याशिवाय मंत्रिपदांचं वाटप कसं असेल, कोणाला किती आणि कोणती मंत्रिपदं याबाबत चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादीने दिलेल्या 50-50 फॉर्म्युल्यावर काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्रिपदावरुन महासेनाआघाडीत पेच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेसची प्रतिक्रिया
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचं ठरलं आहे की आधी आम्ही चर्चा करु, त्यानंतर शिवसेनेशी चर्चा करु, सर्व मुद्द्यांवर चर्चा करु. आज उद्धव ठाकरेंना आम्ही भेटलो, कालच्या पार्श्वभूमीवर सदिच्छा भेट होती, आता आम्ही राष्ट्रवादीसोबत बैठक करु, त्यानंतर पुन्हा सेनेशी चर्चा करु, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
समान कार्यक्रम हा आम्ही एकत्र बसून ठरवू. उद्धव ठाकरेंसोबत आजच्या चर्चेत कशापद्धतीने पुढे जायचं याबाबत बोलणं झालं. सकारात्मक चर्चा झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आधी चर्चा होईल, आधी आम्ही आमचं ठरवू, त्यानंतर शिवसेनेशी चर्चा होईल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे 5-5 जण समितीत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शिफारशीनंतर महाराष्ट्रात अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मात्र भाजप वगळता उर्वरीत तीन पक्ष आता एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत (Uddhav Thackeray meeting with congress) जाऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray meeting with congress) यांनी स्वत: त्याबाबत काल पुन्हा एकदा जाहीर केलं. आता तीनही पक्ष किमान सामायिक कार्यक्रम धोरण आखत असून, एकमेकांशी चर्चेच्या वाटाघाटी सुरु आहेत.
किमान समान कार्यक्रमासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची 5-5 जणांची समिती तयार करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजितदादा पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक यांची नावं, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टावार, माणिकराव ठाकरे समितीत असण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेची नावं समाविष्ट होतील.
काँग्रेस-शिवसेनेची बैठक
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची बैठक होत आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीसाठी काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे उपस्थित आहेत. तर शिवसेनेकडून स्वत: उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर चर्चा करत आहेत. उद्धव ठाकरे दुपारी 12.45 च्या सुमारास हॉटेल ट्रायडंटमध्ये पोहोचले.
दुसरीकडे शिवसेनेचे खासदार आणि खास मोहरा संजय राऊत यांना दुपारी 12.45 च्या सुमारासच लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. ते सुद्धा रुग्णालयातून थेट हॉटेल ट्रायडंटकडे चर्चेसाठी रवाना झाल्याचं सांगण्यात आलं, पण ते रुग्णालयातून घरी परतले.
राष्ट्रवादीचा अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव
राष्ट्रवादीच्या प्रस्तावानुसार मुख्यमंत्रिपद हे अडीच-अडीच वर्षांसाठी असेल. पहिली अडीच वर्षे शिवसेनेचा तर दुसरी अडीच वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असेल. उपमुख्यमंत्रिपद पाचही वर्षे काँग्रेसकडे राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रस्तावावर (NCP proposal to Shivsena for Government Formation) काय प्रतिसाद देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.