मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेकडून आता डॅमेज कंट्रोलला सुरुवात झालीय. शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात पक्ष कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण 6 ठराव मंजूर करण्यात आले. त्यात पाचवा आणि सहावा ठराव अत्यंत महत्वाचा आहे. त्यात बंडखोर किंवा शिवसेनेशी (Shivsena) गद्दारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे आजच्या कार्यकारिणी बैठकीत एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांना शिवसेना नेते पदावरुन हटवण्यात येण्याची शक्यता होती. मात्र, सध्या तरी तशी कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र, संध्याकाळपासून कारवाईला सुरुवात होईल, असे संकेत संजय राऊत यांनी दिलेत.
बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यात येणार का? आणि काय कारवाई करण्यात येणार? असा सवाल विचारण्यात आला. त्यावेळी ही शिवसेना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे आणि राहील. ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दापरी केली. मग ते कोणत्याही पदावर असोत, त्यांच्यावर कठोर कारवाईचे सर्वाधिकारी उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत. लवकरच त्यावर अंमलबजावणी होईल. आज संध्याकाळपर्यंत कारवाई काय ते स्पष्ट होईल, कोण मंत्रिपदावर राहणार, कोण नाही ते दिसेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
इतकंच नाही तर शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत मांडण्यात आलेला सहावा ठरावही महत्वाचा असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. राऊत म्हणाले की, ठराव क्रमांक सहामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं नाव इतर कोणत्याही संघटनेला वापरता येणार नाही. भाषणात उद्धव ठाकरे यांनी एकच मुद्दा मला महत्वाचा वाटतो तो मांडला. जर तुम्हाला मतं मागायची आहेत तर तुमच्या बापाच्या नावाने मागा, शिवसेनेच्या बापाच्या नावाने मागायचे नाहीत, असंही राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.