मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या महाविकासआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे उद्या (गुरुवार 28 नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या विस्तीर्ण मैदानात संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर हा सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी (Uddhav Thackeray Oath Ceremony Preparation) शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे.
जिथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बुलंद आवाज घुमला, त्या शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेच्या साक्षीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
शिवाजी पार्कमध्ये सहा हजार चौरस फुटांवर भव्य व्यासपीठ उभारलं जात आहे. मंचावर शंभर जणांना बसण्यासाठी आसन व्यवस्था केली जाईल. शपथविधीचे साक्षीदार होण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना बसण्यासाठी 60 हजार खुर्च्यांची सोय करण्यात येणार आहे.
शपथविधी सोहळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट पाहण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये कानाकोपऱ्यात 20 एलईडी लावले जाणार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीलाही सजवण्यात येत (Uddhav Thackeray Oath Ceremony Preparation) आहे.
निमंत्रितांमध्ये कोण?
उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिल्याची माहिती आहे. याशिवाय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीसुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहण्याची चिन्हं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे. भाजपकडून कोण उपस्थित राहणार, याची उत्सुकता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीप्रमाणे विविध देशांच्या राजदूतांनाही या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. शेतकरी ते वारकरी, विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही सोहळ्यासाठी आमंत्रित आहेत.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण शपथ घेणार, ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात कोणते चेहरे असणार, हे अद्याप निश्चित झालेलं नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून प्रत्येकी एक असे दोन उपमुख्यमंत्री असतील, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची नावं चर्चेत आहेत.
शरद पवारांचे रोहित पवार आणि बाळासाहेब ठाकरेंचे नातू आदित्य ठाकरे यांनी संसदीय राजकारणात दमदार एन्ट्री घेतलेली आहे. त्यांना अनुभव घेण्यासाठी एक-एक राज्यमंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता (Uddhav Thackeray Oath Ceremony Preparation) वर्तवली जात आहे.
मंत्रिमंडळाचं संभाव्य वाटप
शिवसेना –
11 कॅबिनेट + 4 राज्यमंत्री + 1 मुख्यमंत्री – एकूण 16
राष्ट्रवादी –
11 कॅबिनेट (उपमुख्यमंत्रिपदासह) + 4 राज्यमंत्री – एकूण 15
काँग्रेस –
9 कॅबिनेट (उपमुख्यमंत्रिपदासह) + 3 राज्यमंत्री – एकूण 12 + विधानसभा अध्यक्षपद
शिवसेनेतील मंत्रिपदाचे संभाव्य दावेदार
शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार दिला जाण्याची शक्यता आहे. रवींद्र वायकर यांची नगरविकास मंत्रिपदी वर्णी लागू शकते. तर सुभाष देसाई यांना उद्योग, अब्दुल सत्तार यांना अल्पसंख्याक मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय उदय सामंत यांना गृहनिर्माण मंत्रिमंडळाचा कारभार कारभार दिला जाण्याची माहिती मिळत आहे.
उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला राज ठाकरे उपस्थित राहणार?
याव्यतिरिक्त दादा भुसे, अनिल परब, गुलाबराव पाटील, प्रकाश आबिटकर, दिवाकर रावते, दीपक केसरकर, रामदास कदम, बच्चू कडू, अंबादास दानवे या आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी-काँग्रेसमधून संभाव्य नावं कोणाची?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची धुरा सोपवली जाण्याची चिन्हं आहेत. तर कळवा मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना वैद्यकीय शिक्षण मंत्रालय सुपूर्द केलं जाण्याची शक्यता आहे.
नवाब मलिक यांना कामगार मंत्रालय मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना महसूल खात्याचा कारभार दिला जाण्याचे संकेत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, के. सी. पाडवी या काँग्रेस आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे राजभवनावर
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी आज (बुधवार 27 नोव्हेंबर) नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्याआधी उद्धव ठाकरेंनी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली होती. त्यावेळी सोबत उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही (Uddhav Thackeray Oath Ceremony Preparation) होत्या.