मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी आपला अंतिम निर्णय दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray on Ayodhya verdict) यांनी या निकालाचे स्वागत केले आहे. आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक असल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत निकालावर आपली भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे शुक्रवारी (8 नोव्हेंबर) उद्धव ठाकरेंनी अयोध्या प्रकरणाचा निकाल (Uddhav Thackeray on Ayodhya verdict) येणार असून या निकालाचे श्रेय कुणालाही घेता येणार नसल्याचं विधान करत भाजपला लक्ष्य केलं होतं.
उद्धव ठाकरे म्हणाले, “आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एक वाद सुरू होता. त्या वादावर आता पडदा पडला आहे. म्हणून मी सर्वप्रथम न्यायदेवतेला या न्यायासाठी साष्टांग दंडवत करतो. अनेक वर्षांनी हा न्याय मिळाला आहे. इतकी वर्ष आपण प्रभू रामचंद्र यांच्याविषयीच्या अनेक कथा ऐकत होतो. मात्र, त्यांचा जन्म कोठे झाला होता, होता की नव्हता याच्यावर वाद सुरू होता. तो वाद आज संपला आहे याचा मला नक्कीच आनंद आहे.”
देशालाच नाही, तर जगाला आज बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली असणार. कारण त्यांच्या काळात मी हिंदू आहे हे बोलायला लोक घाबरत होती. तेव्हा शिवसेना प्रमुखांनी प्रत्येकाच्या मनात हिंदुत्वाचा अंगार फुलवला होता. त्यांनी प्रत्येकाला गर्वाने हिंदू असल्याचं सांगण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांनी हिंदुत्वाचा आवाज बुलंद केला, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मी सर्वांना वेडवाकडं होणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. आनंद नक्कीच साजरा करायला हवा. तो आनंद सर्वांना झाला पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यपालांना मी सांगितलं आहे की त्यांच्या हातात सध्या काळजीवाहू सरकार आहे. त्यामुळे राज्यात शांतता राखण्याचं काम आपण करावं. आमच्याकडून पूर्ण सहकार्य असेल. मी तमाम जनतेला, सर्व पक्षांना, सर्व धर्म, जाती-पातीच्या जनतेला आणि शिवसैनिकांनाही शांतता राखण्याचं आवाहन करतो. त्यांनी आनंद जरूर व्यक्त करावा, मात्र असं करताना कुणाची भावना दुखावणार नाही याची खबरदारी घ्यावी. मी इतर धर्मीयांनाही आवाहन करतो की हा आनंदाचा दिवस आहे. आपण एकजुटीने याचं स्वागत करुयात. पूर्वी जे काही घडलं ते उगाळत न बसता नवा चांगला उज्वल इतिहास घडवूया.”
‘पुन्हा शिवनेरीवर शिवरायांना वंदन करुन अयोध्येत जाणार’
उद्धव ठाकरे म्हणाले, “एक नवीन पर्व सुरू होत आहे आपण सर्वांनी मिळून त्याचं स्वागत करूया. मागील वर्षी 24 नोव्हेंबरला मी दर्शन घ्यायला अयोध्येत गेलो होतो. त्यावेळी जाताना मी शिवनेरी किल्ल्यावरील माती घेऊन गेलो होतो. या मातीमध्ये काहीतरी जादू आहे. यानंतर वर्षभरात हा निकाल आला आहे. आता मी पुन्हा 2-3 दिवसात शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवरायांना वंदन करेन. त्यानंतर 24 नोव्हेंबरला पुन्हा अयोध्येत जाईन.”
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
उद्धव ठाकरे म्हणाले होते, “राम मंदिराचा निर्णय लागेल. तो निर्णय न्यायालय देईन. याचं श्रेय सरकारला घेता येणार नाही. सरकारला आम्ही कायदा करुन मंदिर बांधण्याची मागणी केली. राम सत्यवचनी होता. हे काय आहेत? निकाल राम मंदिराच्या बाजूने लागला तर त्याचं श्रेय न्यायालयाचं असेल, सरकारचं नाही. मला आता संघाला विचारायचं आहे की खोटं बोलणारे लोक तुमच्या हिंदुत्वात बसतात. हे खोटारडे लोक कोणत्या तोंडाने रामाचं नाव घेणार आहेत.”