मुंबई : ‘सभागृहात खडसावल्याबद्दल ताई धन्यवाद. सभागृहाचे नियम प्रत्येक सदस्यानं पाळायलाच हवेत,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या (Neelam Gorhe) आडून मंत्री गुलाबराव पाटलांवर (Gulabrao Patil) केली आहे. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले की, ‘काल परवा तुम्ही सभागृहात लोकांना कसं वागायचं हे खडसावून सांगितलं. सभागृहात आलं तर शिस्तीत वागलंच पाहिजे. यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो. हे धन्यवाद ते कोण होते, कुठून आले, यामुळे नाही तर कोणताही व्यक्ती असला तरी सभागृहाची उंची पाळायलाच हवी. सभागृहाची एक मर्यादा आहे. मंत्री असो वा मुख्यमंत्री. सर्वांनी सभागृहाचे पावित्र्य पाळायलाच हवेत. उद्या अगदी मुख्यमंत्री जरी तसं वागले तरी तुम्हाला त्यांचे कान उघडायचं काम करावं लागणार आहे, असे फटकारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लगावले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लक्ष केलं. ‘कोणताही व्यक्ती असला तरी सभागृहाची उंची पाळायला हवी. मंत्री असो वा मुख्यमंत्री सर्वांनी सभागृहाचे पावित्र पाळायलाच हवेत. उद्या अगदी मुख्यमंत्री जरी तसं वागले तरी तुम्हाला त्यांचे कान उघडायचं काम करावं लागणार आहे, असं ठाकरे म्हणालेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हेंचं कौतुक का केलं, सभागृहात नेमकं काय झालं होतं. हे जाणून घ्या…
राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील सभागृहात आवेशपूर्ण अंदाजात भाषण करत होते. यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांना सूचना केली. त्यावर ‘उपसभापती ताई आपण मध्ये बोलू नका,’ असं म्हणत गुलाबराव पाटलांनी नीलम गोऱ्हे यांच्याकडे हातवारे केले. त्यानंतर नीलम गोऱ्हे चांगल्याच भडकल्या. यावेळी गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना फटकारत, ‘तुम्ही आताच्या आता खाली बसा. तुमची ही बोलायची पद्धत आहे का? छाती बडवून विधान परिषदेत काय बोलता. बसा खाली. मंत्री असाल तुमच्या घरी,’ असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांना गोऱ्हे यांनी झाप झाप झापलं.
विधानपरिषदेत शिक्षक आमदार विक्रम काळेंनी शिक्षकांच्या निधीवरुन प्रश्न विचारला. शिक्षणमंत्री दीपक केसरकरांना याच विषयावरुन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गुलाबराव पाटील खाली बसून कुजबुजत होते. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी पाटील यांना पहिल्यांदा समजावलं. त्या यावेळी म्हणाल्या की, ‘खाली बसून बोलू नका, तुमची वेळ आल्यावर तुमचं म्हणणं मांडा.’ यानंतर गुलाबराव पाटलांनी मला बोलायचं आहे, असं म्हणत हातवारे केले आणि बोलायला उभे राहिले, यावर नीलम गोऱ्हे भडकल्या आणि गुलाबराव पाटलांना झाप झाप झापलं.