मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथविधीनंतर तात्काळ कॅबिनेटची बैठक घेतली (Uddhav Thackeray on Secularism) या बैठकीत त्यांनी अनेक विषयांवर चर्चा करत काही महत्त्वाचे निर्णय घेतले. यानंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या निर्णयांची माहिती दिली. यावेळी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरुन चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. त्यानंतर तात्काळ राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावून आल्याचं दिसलं. यावेळी कॅबिनेट मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि इतर नेतेही हजर होते.
प्रश्नोत्तरांच्या दरम्यान एका पत्रकाराने किमान समान कार्यक्रमात ‘सेक्युलर’ शब्दाचा उल्लेख करण्यात आल्याचं सांगितलं. तसंच आता यापुढे शिवसेना देखील सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) झाली आहे का? असा प्रश्न विचारला. त्यानंतर चांगलीच खडाजंगी झाली. या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित पत्रकारालाच सेक्युलरचा अर्थ काय होतो असा प्रश्न विचारला. त्यानंतरही संबंधित पत्रकार मी प्रश्न तुम्हाला विचारला असून तुम्ही उत्तर द्या असं म्हणाला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मी सांगणार नाही, तुम्ही सेक्युलर शब्दाचा अर्थ सांगा असं पुन्हा म्हटलं.
पत्रकार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद संपत नसल्याचं लक्षात येताच छगन भुजबळ यांनी चर्चेत हस्तक्षेप करत पत्रकाराला उत्तर दिले. छगन भुजबळ म्हणाले, “सेक्युलर हा शब्द भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत आहे. तुम्ही संविधान वाचा. संविधानात जे काही आहे ते आहे. त्यावरच आधारिक किमान समान कार्यक्रम आहे.” त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील त्याला सहमती दर्शवत सेक्युलर शब्द संविधानात असल्याचं म्हटलं.
रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 20 कोटी
उद्धव ठाकरे यांनी आपल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत किल्ला संवर्धनाबाबत ठोस निर्णय घेतला. त्यांनी राजगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 20 कोटी रुपयांची तरतुद करण्याची घोषणा केली. रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 606 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार आहे. या आराखड्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय प्रलंबित होता. हे लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी रायगड किल्ल्याच्या विकास कामांची नस्ती मागवली. तसेच विशेष बाब म्हणून निधी वितरणाच्या प्रस्तावास मान्यता देवून त्यासंदर्भातील नस्तीवर पहिली स्वाक्षरी केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले हा राज्याचा समृद्ध वारसा आहे. त्याचे जतन करणे आणि पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी संवर्धन करणे आवश्यक आहे. राज्यशासन त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करील, असं मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केलं.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेलाही उत्तर दिले. ते म्हणाले, “ज्यांनी टीका केली त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. त्यामुळे हे मंत्रिमंडळ कोणत्या विभागाचे आहे, हे त्यांनी अभ्यास करुन सांगावे.”