गजानन उमाटे, नागपूरः महाराष्ट्राची कर्नाटक (Karnataka) व्याप्त 865 गावं महाराष्ट्रात आणणारच, तोपर्यंत सीमावर्तियांसाठी विविध योजना राबवणार असल्याचा ठराव आज महाराष्ट्राच्या (Maharashtra) विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रथमच सरकारच्या या निर्णयाचं अभिनंदन केलं. महाराष्ट्राच्या हिताच्या निर्णयाला आम्ही विरोध करणार नाही, मात्र ठरावातील काही आक्षेपही त्यांनी माध्यमांसमोर ठेवले.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ कर्नाटक सरकारने आपल्या सरकारसोबत बैठक झाल्यानंतरही एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, असा कौरवी थाटाचा ठराव केला. त्यानंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनात आपल्याकडूनही उत्तर देण्याची गरज होती.
निदान तिथल्या सीमाभागातील अन्यायग्रस्त मराठी भाषिकांच्या पाठिशी आपण उभे आहोत, असा ठराव मंजूर केला. याबद्दल सरकारचं अभिनंदन. महाराष्ट्राच्या हिताचं जे काही असेल त्यासाठी दुमत असू नये, असं आमचं मत आहे. आम्ही पाठींबा दिलाय, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
यासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विकास याचिका दाखल करावी. एक निरीक्षक पाठवून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाठवावे. तिथल्या ठिकाणांचे नामांतर, भाषिक व्यवहारांमध्ये कसे बदल झालेत? हे पहावे… तिथल्या लोकांवर भाषिक अत्याचार थांबवण्यासाठी ही याचिका दाखल केली गेली पाहिजे, असे ठाकरे यांनी सूचवले आहे.