मुंबईः महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) शामिल झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं हिंदुत्व मवाळ झाल्याचा आरोप केला जातो. तर सध्या हिंदुत्वावरून जे राजकारण सुरु आहे, ते शिवसेनेला (Shivsena) अपेक्षित असलेलं हिंदुत्व नाही, असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंकडून वारंवार देण्यात येतंय. राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का, असाही सवाल केला जातोय. यावर उद्धव ठाकरे यांनी एकाच शब्दात उत्तर दिलं.
राहुल गांधी जे बोलले त्याच्याशी आम्ही सहमत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात अतीव आदर, प्रेम आहेच. पण ज्या स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केला, ते स्वातंत्र्य अबाधित राखणे आजची गरज आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.
राहुल गांधी सावरकरांबद्दल बोलल्यावर मला प्रश्न विचारला जातोय, पण भाजपने मुफ्ती मोहंमद सैद यांच्यासोबत पाट मांडला, त्यावर मी बोललो. तेव्हा कुणीच काही बोलत नाही. आमच्या भूमिकांबद्दल विचारण्याआधी तुमचा इतिहास पहा, स्वातंत्र्यलढ्यात तुम्ही होते का? होतात तर त्यावेळेला निझाम किंवा रझाकार हिंदुंवर अत्याचार केला तेव्हा का नाही भूमिका घेतली?असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
आज देशाचं स्वातंत्र्य धोक्यात येतंय, देशाची वाटचाल गुलामगिरीकडे जातेय, डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेली घटना टिकेल की नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे स्वातंत्र्य वाचवण्यासाठी जे जे लढत आहेत, त्यांनी एकत्र आलच पाहिजे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात असून काल वाशिम येथे राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल एक वक्तव्य केलं.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांची पेंशन घेत होते. ते ब्रिटिशांसाठी काम करत होते, असं वक्तव्य त्यांनी केलं. तसंच आज अकोला येथील पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी एक पत्र सादर केलं. सावरकरांनी ब्रिटिशांना लिहिलेलं हे पत्र असल्याचा दावा त्यांनी केला. त्यानुसार, मी तुमचा नोकर राहिन, असं सावरकरांनी पत्रात लिहिल्याचं राहुल गांधी म्हणाले.
एकूणच राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्राचं राजकारण आज ढवळून निघालंय.