मुंबई : शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. ठाकरे सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मनातील खंत व्यक्त केली. बंडखोर आमदारांच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच महाविकास आघाडीतील सहकारी शरद पवार (Sharad Pawar) आणि सोनिया गांधी तसंच सरकारमधील सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. ‘मला मुख्यमंत्रीपद सोडण्याची खंत अजिबात नाहीय. माझी इच्छा होती, नव्हती तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला ठाकरे कुटुंब माहीत आहे. आम्ही हिंदूंसाठी काम करतो. मी सगळ्यांच्यासमोर मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत आहे’, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली. मात्र, उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याची माहिती शरद पवार यांना नसल्याचं कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीच ही आश्चर्यकारक माहिती माध्यमांशी बोलताना दिलीय.
उद्धव ठाकरे आज राजीनामा देणारं आहेत याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माहिती नव्हतं. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन घोषणा केली त्यावेळी मला आणि शरद पवार यांना माहिती मिळाली. शरद पवार यांना याचं आश्चर्य वाटलं, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी शरद पवार यांना त्याची माहिती दिली नव्हती आणि ती का दिली नव्हती? असा प्रश्न विचारला जातोय.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जनतेशी संवाद – LIVE https://t.co/ogsYKE1vvk
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 29, 2022
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्याची भूमिका स्वीकारली. महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचं सरकार राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे यासाठी प्रयत्न केले. काँग्रेसची संख्या कमी होती, राष्ट्रवादीची संख्या कमी होती. भाजपच्या विरोधात शिवसेनेनंही आमच्यासोबत येण्याचा निर्णय केला आणि महाराष्ट्रात संख्येची बेरिज झाली. हे सरकार अतिशय चांगलं चाललं. दुर्दैवानं शिवसेनेचे काही आमदार दुरावले. ते जरी म्हणत असले की आम्ही शिवसेनेतच आहोत, पण त्यांचा पाठिंबा नसल्यानं उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
Jayant Patil | Sharad Pawar यांना CM Uddhav Thackeray यांच्या राजीनाम्याची माहिती नव्हती? #JayantPatil #Sharadpawar #UddhavThackeray pic.twitter.com/Pb3RdpnLvV
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 29, 2022
एक चांगलं सरकार महराष्ट्राच्या मनातील, लोकांच्या हिताचं, स्वच्छ, कोरोना काळात गोरगरिबांच्या हितासाठी सरकारने जे काम केलं. देशात सर्वात मोठा आदर्श त्यांनी निर्माण केला. कोरोना काळात एक सरकार, मुख्यमंत्री किती चांगलं काम करु शकतो, याचा आदर्श त्यांना घालून दिला. आज संख्याबळ नसल्यामुळे ते पायउतार झाले असले तरी दीर्घकाळ ते महाराष्ट्राच्या मनात राहतील, असंही जयंत पाटील म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांना मुख्यमंत्री पदावर बसवल्यापासून शेवटपर्यंत शरद पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मोठी साथ दिली आहे. त्यांनी शेवटपर्यंत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला साथ दिली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या अगदी शेवटपर्यंत आम्ही, पवारसाहेबांनी त्यांना पाठिंबा देत त्यांना साथ देण्याचं काम केलंय. आज त्यांचा राजीनामा झालाय. पुढच्या काळात आम्ही एकत्र बसू आणि पुढची भूमिका काय हे निश्चित करु.