मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात पावसाळ्यात समुद्रात उठाव्या तशा मोठ्या लाटा उठल्या आहेत. राज्याचं राजकारण सध्या या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्याला धडकताना पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) बंडाने शिवसेनेचं सरकार अडचणीत आणलं आहे. अशातच सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी आपल्या फेसबुक लाईव्हद्वारे (Cm uddhav Thackeray Facebook Live) शिवसैनिकांना भावनिक साद घातली. तसेच आपण आज वर्षा हा शासकीय बंगला सोडून आपल्या मातोश्री या बंगल्यावर मुक्कामाला जात असल्याचे जाहीर केले. त्यानंतर सर्व साहित्य घेऊन मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावरून मातोश्री बंगल्याकडे रवाना झाले. मात्र मुख्यमंत्र्यांवर या संपूर्ण प्रवासात शिवसैनिक त्यांच्यावर पुष्पवर्षाव करत होते. तिकडे हॉटेलमध्ये बसून हे पाहणाऱ्या एकनाथ शिंदेंना या अवकाळीतील गारा वाटत असतील. मात्र या पंचवीस मिनिटातच मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांची मनं कशी जिकली, त्यांच्या काळजाला कसा हात घातला हे दिसून आलं.
मुख्यमंत्र्यांचा हा प्रवास बघून अनेकांना शरद पवारांचं ते पावसातलं साताऱ्यातलं भाषण आलं. शरद पवारांच्या या भाषणाआधी राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं होतं. अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपच कमळ हाती घेतलं होतं. मात्र या पावसातल्या भाषणाने राज्यातल्या राजकारणाची समीकरणच बदलून टाकली. मुख्यमंत्र्यांचा आजचा वर्षा ते मातोश्री प्रवासही अनेकांना असाच काहीसा भासत होता.
शरद पवारांच्या पावसातल्या भाषणाआधी राष्ट्रवादी संपली आहे. राष्ट्रवादी लढायला कोणी उतलेच नाही, अशी टीका होत होती. सध्या शिवसेनेवरही अशात प्रकारची टीका होत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांची ही भावनिक साद पुन्हा राज्याचं राजकारण बदलू शकते हा विश्वास शिवसैनिकांमध्ये निर्माण करणारा हा प्रवास होता.
मुख्यमंत्र्यांच्या या प्रवासात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबियच नव्हते, तर या प्रवासात त्यांच्यासोबत अनेक हजारो निष्ठावंत शिवसैनिक होते. या शिवसैनिकांसाठी हा क्षण गहिवरून टाकणारा होता. ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्री परिसरात दाखल झाले. त्यावेळी हजारो शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत केलं. मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी गाडीबाहेर येत ठाकरे शैलीत सर्वांना पुन्हा एकदा अभिवादन केलं.
या प्रवासात शिवसैनिक हे फुलांच्या वर्षावासोबत जोरदार घोषणाबाजीही करत होते. या घोषणा जरुर तिकडे हॉटेलात बसलेल्या एकनाथ शिंदे यांच्या काळजाला रानावनातले काटे बनून टोचत असतील.