मुंबई : रविवारचा (20 फेब्रुवारी) संपूर्ण दिवस हा दोन मुख्यमंत्र्यांच्या (Two chief ministers) एकत्र भेटीचं प्रमुख आकर्षण होता. देशाच्या राजकीय वर्तुळाचं ज्या भेटीकडे लक्ष लागलं होतं, ती भेट रविवारी मुंबईत पार पडली. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे वर्षा निवासस्थानी (Varsha Bungalow in Mumbai) गेले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाच्या मुख्मयंत्र्यांमध्ये चर्चा झाली. याबाबतचा एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओत एक चकीत करणारी गोष्ट दिसून आली. व्हिडीओच्या सुरुवातीला जिथं शिवसेना खासदार संजय राऊत आणि इतरांची लगबग दिसतेय. तर याच व्हिडीओच्या पुढच्या भागात चक्क उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा तेजस ठाकरे (Tejas Thackeray) देखील दिसून आल्यानं अनेकांचा नवल वाटलं.
फारशा राजकीय कार्यक्रमांत, घडामोडींत किंवा फारसे चर्चेतही नसलेले तेजस ठाकरे के. चंद्रशेखर राव यांच्या सोबत चर्चा करताना दिसले. उद्धव ठाकरे हे देखील समोरच बसले होते. उद्धव ठाकरेंच्या धाकट्या मुलीच्या चंद्रशेखर राव यांच्यासोबतच्या भेटीची चर्चा झाली नसती, तरच आश्चर्य!
57 सेकंदांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओच्या शेवटच्या दहा सेकंदात तेजस ठाकरेंची इन्ट्री होते. त्यांना बसायला खूर्ची आणून दिली जाते. के. चंद्रशेखर राव यांना काहीतरी सांगत असताना तेजस ठाकरे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. ही चर्चा नेमकी कशाबद्दलची होती, यावरुन चर्चांना उधाण येणं स्वाभाविकच आहे. निळा सदरा आणि सफेद पायजमा परिधान केलेल्या वेशात तेजस ठाकरे यावेळी दिसून आलेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि के. चंद्रशेखर राव यांची वर्षा निवासस्थानी भेट झाली. या भेटीदरम्यान, अनेक वेगवेगळ्या विषयांवर, प्रश्नांवर आणि राजकीय पैलूंवर चर्चा झाली नसेल, असं होऊच शकत नाहीत. मात्र याच वेळी चंद्रशेखर राव यांना उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा तेजसही तिथंच आसपास असल्याचं दिसलं. त्यानंतर लगेच तेजसलाही बसण्यासाठी हातानंच खुणावलं. पण बसायला खूर्ची नसल्यानं त्यांनी खूर्चीही आणायला सांगितली. ‘त्याला बोलवा, इथं खूर्ची आणा, बस की बाळा’ अशा अर्थाची दृश्य राव यांच्या देहबोलीतून झळकली आहेत. यानंतर तेजस ठाकरेही आले. वडील उद्धव ठाकरे यांच्या समक्ष तेजस विश्वासनं के चंद्रशेखर राव यांच्याशी चर्चा करताना दिसून आलेत. ही चर्चा राजकीय होती की नव्हती, याचे तर्क वितर्क लढवले जात असतानाच, तेजस ठाकरे आता लवकरच राजकारणातही सक्रिय होणार आहेत की काय? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.
चंद्रशेखर राव यांच्या आजच्या मुंबई दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे गैरहजर होते. आपल्या नियोजित दौऱ्यामुळे ते मुंबईत नव्हते. मात्र आदित्य नसताना तेजस ठाकरे यांनी चंद्रशेखर राव यांच्यासोबत केलेली चर्चा ही अनेकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली नसती, तरच आश्चर्य! झालंही तसंच.
गेल्या अनेक वर्षांपासून तेजस यांची राजकीय इन्ट्री कधी होणार, याची चर्चा रंगलेली आहे. मात्र राजकीय घडामोडी, राजकारणात येण्याच्या चर्चा, यांपासून तेजस नेहमीच लांब राहिलेत. निसर्गात रमणं, वेगवेगळ्या प्राण्यांच्या प्रजाती शोधणं, या सगळ्यात रमलेल्या तेजस ठाकरेंचा स्वभाव हा राजकारणापासून त्यांना लांब ठेवणाराच राहिला आहे. पण मुंबईतल्या वर्षा बंगल्यावर दिसलेल्या त्यांच्या सदरा-पायजम्यातील हजेरीनं आणि के. चंद्रशेखर राव यांच्यासोबत साधलेल्या संवादानं तेजस ठाकरेंची एक नवी छबी कॅमेऱ्यानं टिपली आहे. ठाकरेंचा दुसरा मुलगाही आता राजकारण येण्यासाठी सज्ज झालाय का? हा प्रश्न त्यानिमित्त उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत तेलंगणाचे मुख्यमंत्री राव आणि ठाकरेंचा धाकटा मुलगा तेजसही दिसला… चर्चा तर होणारच! pic.twitter.com/NN6q6Q0hRb
— Siddhesh Sawant (@ssidsawant) February 20, 2022
नव्या आघाडीचा लवकरच बारामतीतून एल्गार, भाजपला टक्कर देण्याचा प्लॅन काय?