जालनाः सध्याचं सरकार न्यायव्यवस्था आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र साहित्यिकांनी समाजातील परिस्थितीची जाण ठेवत, वेळीच ती शब्दांतून मांडावी. गरज पडेल तेव्हा समाजाचं नेतृत्व करावं, अन्यायाविरोधात वाचा फोडावी, असं आवाहन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं. 42 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या (Marathwada sahitya sammelan) उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं. याप्रसंगी भाषणादरम्यान त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर कठोर भाष्य केलं.
स्वतःला राजे समजतात ते सर्वात जास्त राज्याचं नुकसान करतात.. तुमच्या मतांची किंमत आज खोक्यांमध्ये मोजली जाते. आत्ता तुम्ही दिलेली मतं कुठे जातात हे तुम्हाला माहिती का?
आधी सूरत आमि नंतर गुवाहटी…. ही मतं कुठे जातात ते आधी जाहीर करावं. या देशातील लोकशाही संपली आहे, हे जाहीर करा, तुमच्या घरी खोका पाठवू. सर्वकाही स्वतःच्या बुडाखाली असलं पाहिजे, असा सरकारचा अट्टहास आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
न्यायपालिका सरकारला आपल्या बुडाखाली घ्यायची आहे. आज पंतप्रधान बोले सो कायदा आहे. देशात फॅसिस्ट वृत्ती आहे, पूर्वी आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं होतं पण आता स्वातंत्र्य टिकवण्याचं आव्हान आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.
साहित्यिकांनी हे वातावरण बदलण्याची हिंमत दिली पाहिजे. सगळेच प्रवाहपतीत होणार असतील तर त्याला काही अर्थ नाही.
कलाकार आणि साहित्यिकांकडून वेगळी अपेक्षा असते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आजोबा आणि वडिलांची यावेळी आठवण करून दिली. ते म्हणाले, ‘ माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि वडील बाळासाहेब ठाकरे साहित्यिक होते. प्रबोधन सुरु केलं. नाटकं लिहिलं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी नेतृत्व केलं. शब्द लिहित होते आणि वाणीने समाजमनही जागं केलं. अन्यायाविरोधात प्रहार केले. त्यांनी कशाचीही पर्वा केली नाही.
त्यांच्या लहानपणी आमच्या घरावर, दरवाजावर कचरा टाकला जायचा. मेलेली कृत्री टाकली जायची. पण त्यांनी आपला परखडपणा सोडला नाही. तेच काम त्यांच्या पुत्राने शिवसेना प्रमुखांनी केलं. व्यंगचित्रातून त्यांनी मराठी मनं पेटवली, चेतवली, अन्यायाविरुद्ध लढायचं शिकवलं. शिवसेना काढली. मार्मिक, सामना काढला. त्यांच्या सभांना हजर असलेले आजही इथे असतील. मला जे पटत नाही, त्याला विरोध करणारच… ही त्यांची भूमिका घेऊन मी पुढे जात आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.