वज्रमूठ एकवटा, महाराष्ट्र द्रोह्यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, महामोर्चात उद्धव ठाकरेंचा निर्धार

| Updated on: Dec 17, 2022 | 2:22 PM

आपण सगळे महाराष्ट्र प्रेमी महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालून जाऊ. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी डिवचलं, त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.

वज्रमूठ एकवटा, महाराष्ट्र द्रोह्यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, महामोर्चात उद्धव ठाकरेंचा निर्धार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः  महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आवाहन केल्यानंतर विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाखोंच्या संख्येने महामोर्चात (Mahamorcha) सहभाग नोंदवला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर प्रथमच हा ऐतिहासिक मोर्चा अवघा देश पाहतोय. आता ही एकजूट महाराष्ट्र द्रोह्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, त्यांना मातीत गाढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला.

मुंबईत आयोजित महाविकास मोर्चाच्या प्रमुख सभेला उद्देशून उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना हा निर्धार व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अजित पवार, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड आदी महत्वाचे नेते उपस्थित होते.

आपण सगळे महाराष्ट्र प्रेमी महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालून जाऊ. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी डिवचलं, त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्या नंतरचं हे दृश्य पहिल्यादाच देश पाहतोय, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.

शिवसेनेतील बंडखोरांवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज सगळे पक्ष एकवटले आहेत. फक्त महाराष्ट्र द्रोही या मोर्चात नाहीयेत. स्वतःला बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे तोतये .. खुर्चीसाठी लाचारी करणारे हे आहेत. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मिता झुकवणार नाही आणि जो तसा प्रयत्न करेल, त्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही, ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे.

राज्यपालांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ मी त्यांना राज्यपाल मानतच नाही. त्या पदावर कुणीही बसावं आणि कुणालाही टपल्या माराव्यात ,हे सहन करणार नाही. केंद्रात जे बसतात, त्यांच्या घरी काम करणारा माणूस राज्यपाल म्हणून पाठवून दिलं. सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतात.. हे आता महाराष्ट्र सहन करणार नाही….

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले ज्या लोकांनी तेव्हा शेणमार, धोंडमार सहन करून कार्य केलं, त्यांनी ते केलं नसतं तर आज आपणही यांच्यासारखे मंत्री बनून शाब्दिक भीक मागत बसलो असतो. हे वैचारिक दारिद्र्य आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.

मुंबई ही स्क्वेअर फुटात विकणारी जागा नाही

मुंबईचे तुकडे पाडणाऱ्याचे मनसुबे असणाऱ्यांनी या मोर्चातील गर्दी पहावी, या गर्दीने महाराष्ट्र द्वेष्ट्यांचे डोळे उघडले पाहिजे. उघडत नसतील तर ते कधीच उघडू नयेत, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय.

मुंबई ही स्क्वेअर फुटात विकाणारी जागा नाही. तिच्याशी खेळ केला तर हा आगडोंब पेटल्याशिवाय राहणार नाही.
आम्ही सर्वजण ही आमची मातृभूमी आहे. पण आमचे पालकमंत्री केवळ मुंबईचा हिशोब स्क्वेअर फुटात करतात. मुंबई ही स्क्वेअर फूटात होऊ शकत नाही. ही मुंबादेवी आहे. माय माऊली आहे.

माईक बंद पडतो तेव्हा…

भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांचा माईक अचानक बंद पडला. काही मिनिटात तो सुरुही झाला. मात्र यावरून उद्धव ठाकरेंनी सुनावलं. माईक बंद पडला तरीही हा आवाज दिल्लीचे कानाचे पडदे फाडून गेला पाहिजे.

एका बाजूने आदर्श पायदळी तुडवायचे. महाराष्ट्राचे उद्योग दुसऱ्या राज्यात पळवून न्यायचे. गावं कुरतडू द्यायची. महाराष्ट्र द्रोह्यांचा राजकारणात शेवट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही… पक्ष बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या प्रेमासाठी द्रोह्यांना मातीत गाढल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.