मुंबई : (Shiv sena) शिवसेना कुणाची..? यावरुन सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असली तरी हा पक्ष आपलाच कसा हे शिवसेना आणि (Eknath Shinde) शिंदे गटाकडूनही पटवून दिले जात आहे. (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र, शिवसेनेची बीजं आणि पक्षाच्या निर्मीतीचा उद्देशच मार्मिकच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मांडली आहेत. हे मांडत असताना त्यांनी जे पक्षावर दावा करतात त्यांनाही फटकारले आहे. काहींना वाटतं शिवसेना उघड्यावर पडलेली वस्तू, कोणीही घेऊन जाऊ शकतो असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव ने घेता त्यांच्यावर टीका केली आहे. शिवाय शिवसेना पक्ष आपलाच कसा हे देखील त्यांनी पटवून दिले आहे.
मार्मिककडे आणि शिवसेनेकडे तरुणाचा ओढा कायम राहिला आहे. व्यंगचित्रकार काय असतो. तो काय करू शकतो याचं जगातील उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना आहे. शिवसेना नसती तर मराठी माणूस आणि हिंदूचं काय झालं असतं हे लक्षात येतं. शिवसेनेची बीजं ही मार्मिकमध्ये आहेत. मार्मिकने अस्वस्थ मन हेरलं एवढेच नाहीतर शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेनेने सामनाला जन्म दिला. मी का सांगतोय तर काही लोकांना वाटतं शिवसेना ही उघड्यावर पडलेली वस्तू आहे. कोणीही उचलून घेऊन जाऊ शकतो. तसं नाहीये. शिवसेनेची पाळंमूळं ६२ वर्षांपासून आहेत. त्या आधीपासून माझ्या आजोबांनी विचारांची पेरणी केली. असेही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पटवून दिले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्मिक आणि शिवसेनेची कशी नाळ जुडलेली आहे हेच आजच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिवसैनिकांना सांगितले आहे. केवळ दावा केला म्हणून पक्ष आपला होत नाही. त्यासाठी पक्ष स्थापनेचा उद्देश, त्याची पायमुळं काय आहेत हे देखील पाहणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाहीतर शिवसेनेची पायमुळं ही 62 वर्षापासूनची असल्याचे सांगत ज्यांनी पक्षावर दावा केला त्यांना ठाकरे यांनी फटकारले आहे.
मार्मिकच्या वर्धापनाचे औचित्य साधत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्याला हात घालत शिवसेना आपलीच कशी हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मार्मिकमुळे शिवसेनेचा जन्म झाला हे खरे आहे पण शिवसेनेमुळे मराठी माणसाला न्याय मिळाला तर हिंदुत्वही टिकून राहिल्याचे ठाकरे यांनी सांगितले आहे. एकीकडे शिंदे गटाकडून आता पक्षावरच दावा केला जात असताना दुसरीकडे शिवसेनेकडून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न सुरु आहे. सदस्य नोंदणी आणि प्रतिज्ञापत्रही घेतली जात आहेत.