उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : नवाब मलिक

| Updated on: Nov 26, 2019 | 6:24 PM

"महाराष्ट्रात उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील", असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (uddhav thackeray to become chief minister of maharashtra) यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : नवाब मलिक
Follow us on

मुंबई : “महाराष्ट्रात उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (uddhav thackeray to become chief minister of maharashtra) यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाने राज्यातील बहुमतचाचणीवर निकाल दिल्यानतंर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर महाविकासआघाडीकडून सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. यावेळी नवाब मलिक (uddhav thackeray to become chief minister of maharashtra) यांनीही महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार येईल आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, असं सांगितले.

“महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार आहेत. यापूर्वीच्या बैठकीतही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे, असं शरद पवार यांनी सांगितले होते. त्यावर उद्धव ठाकरेंनीही होकार दिला आहे. बैठीकनंतर उद्धव ठाकरे हे राज्यपाल यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यास जाणार आहेत”, असं नवाब मलिक यांनी सांगितले.

“आज सकाळी साडे दहा वाजता सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल आल्यानंतर भाजपने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. कालपर्यंत भाजप आमच्याकडे 130 आणि 137 आमदार असल्याचे बोलत होते. भाजप कुठेतरी घोडेबाजार करुन किंवा आमदारांची फोडाफोड करुन सत्तास्थापन करण्याचा प्रयत्न करत होती. पण कोर्टाने निकाल दिला. ज्यामध्ये गुप्तमतदान न करता बहुमत चाचणी ही लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे करावी, असं कोर्टाने सांगितले. त्यामुळे भाजपला घोडेबाजार करता येत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला”, असं नवाब मलिक म्हणाले.

“हे कर्नाटक नाही, गोवा नाही किंवा मणीपूर नाही, हे महाराष्ट्र आहे, असं शरद पवारांनीही सांगितले होते. आज आमच्या तिन्ही पक्षांचे आमदार आणि अपक्ष आमदारांसोबत बैठक आहे. यामध्ये नेता निवड करण्यात येणार आहे”, असंही नवाब मलिक म्हणाले.

“भाजप मंडळी आणि नेते बोलत होते की, तिन्ही वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र कसे राहतील. मी त्यांना सांगतो की आम्ही मराठी माणसासाठी, समाजासाठी काम करणार आहे. आता राज्यात रयतेचे राज्य असेल. आता धर्म, जातीच्या नावावर कुणावर अन्याय होणार नाही. शिवसेना भाजपसोबत जाऊन बिघडली होती”, असंही मलिक यांनी सांगितले.

मलिक म्हणाले, आमचे सरकार हे दिर्घकालीन टिकेल. पुढील 20 ते 25 वर्ष हे तिन्ही पक्षाचे समीकरण टिकेल. भाजपचा अंत होण्याची सुरुवात झाली आहे. भाजप अंहकारी झाली होती. नेतेही अंहकारी झाले होते. त्यांचा अंहकार जनतेने संपवला आहे”