मुंबई : अजूनही वेळ गेलेली नाही, आता पालखीचे भोई होणार नाही, तर शिवसैनिकच मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत बसणार, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माहिती आहे. मालाडमधील हॉटेल ‘द रिट्रीट’वर शिवसेनेच्या सर्व आमदारांसोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवण्याचा विश्वास (Uddhav Thackeray wants Shivsena CM) पुन्हा बोलून दाखवला आहे.
उद्धव ठाकरे स्वतः कार चालवत ‘मातोश्री’ निवासस्थानावरुन मढला रवाना झाले होते. यावेळी पत्नी रश्मी ठाकरेही त्यांच्यासोबत होत्या. आधी आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी करणारे शिवसैनिक आता उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदासाठी जोर धरताना दिसत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे स्वतःच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होणार का, असा प्रश्न पडला आहे.
शिवसेना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहे. परंतु भाजपकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलेलं आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत भाजप यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या हाती स्टिअरिंग, महाराष्ट्राचं स्टिअरिंगही हाती धरणार?
दुसरीकडे, शिवसेनेने आपलं सरकार स्थापन करण्याचा नारा दिल्यामुळे भाजप-शिवसेना महायुतीचं सरकार येणार, की शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी वारंवार होते. त्याचप्रमाणे गटनेतेपदी निवडलेले गेलेले एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्याही नावाची चर्चा होताना दिसते. परंतु आता उद्धव ठाकरेंच्या नावाचे पोस्टर्स लावलेले दिसत (Uddhav Thackeray wants Shivsena CM) आहेत.
शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसने अखेर हिरवा कंदिल दाखवल्याची चर्चा आहे. जयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत हा सूर निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा प्रस्ताव काँग्रेस हायकमांडच्या कानावर घातला जाणार आहे. परंतु काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधीच यावर अंतिम निर्णय घेतील. मात्र भाजपला सत्तेपासून दूर राखण्यासाठी सेनेला पाठिंबा देण्याची खेळी काँग्रेस-राष्ट्रवादी खेळू शकते, अशी चर्चा आहे.