मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका दिलाय. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना उद्याच बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडे नऊ वाजता फेसबुक लाईव्हद्वारे (Facebook Live) जनतेशी संवाद साधणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री म्हणून शेवटचं संबोधन आहे का? अशी चर्चा सुरु झालीय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.
एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री काय बोलणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांचं हे मुख्यमंत्री म्हणून जनतेशी शेवटचा संवाद आहे का? असंही विचारलं जात आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी परिवहन मंत्री अनिल परब राजभवनात दाखल होत आहे. यावेळी ते मुख्यमंत्र्यांचा कोणता निरोप किंवा लिफाफा घेऊन गेले? असा प्रश्नही विचारला जातोय.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ठाकरे सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारच्या विरोधात गेला आहे. त्यामुळे उद्याच ठाकरे सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावं लागणार आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर ठाकरे सरकार आता उद्या बहुमत सिद्ध करणार की मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेचे मुख्यप्रतोद सुनील प्रभू यांनी कोर्टात याचिका दाखल करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत सिद्ध करण्यास ठाकरे सरकारला सांगितलं आहे. राज्यपालांच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती प्रभू यांच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाला केली होती. त्यावर कोर्टात सुनावणी झाली असता ठाकरे सरकारच्या विरोधात निकाल गेला. परिणामी सरकारला बहुमत सिद्ध करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.