मुंबई: मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज शिवसेना (shiv sena) भवनमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. दोन अडीच वर्ष एफबी लाईव्हमधून संवाद साधत होतो. आज आपण समोरासमोर भेटत आहोत. तुम्हाला माझ्याकडून राजकीय प्रतिक्रिया हवी असेल. मी कालच नव्या सरकारचं अभिनंदन केल्याचं यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मात्र हे सरकार ज्यापद्धतीने स्थापन झाले, ज्या पद्धतीने एका कथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्यात आले, तेच तर अडीच वर्षांपूर्वी मी अमित शाह यांना सांगत होतो. जर अडीच वर्ष भाजपाचा आणि अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, ज्या पद्धतीने आताचे सरकार स्थापन झाले आहे, तशीच मागणी आम्ही अडीच वर्षांपूर्वी केली होती. अडीच वर्षांपूर्वी आमची मागणी मान्य झाली असती. अडीच वर्ष शिवसेनेचा आणि अडीच वर्ष जर भाजपाचा मुख्यमंत्री बनला असता तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता. आत तुम्ही एका कथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवून तेच तर केले आहे. सध्या जो भाजपाने मुख्यमंत्री केला आहे, तो शिवसेनेचा मुख्यमंत्री नसल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी यावेळी जनतेचे आभार देखील मानले आहेत. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा मी ऋणी आहे. मी मुख्यमंत्रीपद सोडताना तुमच्या डोळ्यात जे अश्रू आले तीच माझी खरी ताकद असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.
भाजपाचे सरकार सत्तेत येताच मेट्रो कारशेड पुन्हा एकदा आरेमध्येच उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. माझा राग मुंबईवर काढू नका, आरेचा आग्रह उगाच रेटू नका, त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होईल. मेट्रो शेडसाठी कांजूरचा प्रस्ताव आहे. त्यामध्ये माझा अहंकार नसल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.