मुंबई : दसरा मेळाव्याच्या(Shivsena Dasara Melava 2022) निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यात घमासान सुरु आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला तोडीस तोड देण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात आहे. यासाठीस शिंदे गटाने देखील दसरा मेळाव्याचा घाट घातला आहे. त्यातच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी थेट मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. यामुळे थेट दसरा मेळाव्याच्या माध्यमातून भाजपला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी जबरदस्त प्लानिंग सुरु केले आहे.
कोणत्याही परिस्थितीत शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने देखील दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. यामुळे हा वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे.
तर दूसरीकडे या मेळावा यशस्वी करण्यासाठी उद्धव ठाकरे सर्व शक्ती पणाला लावणार आहेत. दसरा मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. दसरा मेळाव्याला तीन लाख लोकांची गर्दी जमवण्याचे लक्ष्य उद्धव ठाकरे यांनी ठेवले आहे.
दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठीही उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 21 तारखेला गोरेगावच्या NSC संकुलात शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटप्रमुखां मार्गदर्शन करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे गटप्रमुखांच्या मेळाव्याच्या माध्यमातून उत्तर देणार आहेत.
उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर विभाग प्रमुखांची बैठक घेतली. ज्यांना रहायचे आहे ते राहतील आणि ज्यांना जायचे असेल त्यांच्यासाठी दरवाजे हे खुलाच आहे असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आपले आक्रमक रुप दाखवले. यामुळे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा वेगळाच ठाकरी बाणा पहायला मिळेल.