अकोला : ज्येष्ठ विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) हे अकोला येथे एका सत्कार सोहळ्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. निकम म्हणाले, पक्षांतर कायद्यात पळवाटा असल्यानं राजकीय अस्थिरता आली आहे. याचा गैरफायदा राजकीय पक्ष घेतात. त्यामुळं हा पक्षांतर कायदा कठोर केला पाहिजे. यामुळं अशाप्रकारची राजकीय अस्थिरता (Instability) कुठंही येणार नाही. ही राजकीय अस्थिरता लवकरात लवकर संपावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सत्तेचा सारीपाट कोणाकडे आहे. आपल्याकडे कसा येईल, हाच प्रयत्न प्रत्येक राजकीय पार्टी (Political party) करत असते. त्यामुळे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात तर दुसऱ्या पक्षातून तिसरा पक्षात जाण्याचा क्रम हा सुरूच राहणार आहे. त्यावर लगाम लावण्यासाठी पक्षांतर कायदा अजून कडक करणे आवश्यक असल्याचं ही यावेळी उज्वल निकम म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य केलं. ते म्हणाले, वसंतरावांच्या घरी नांदायचं, गळ्यात मंगळसूत्र पंडितरावांच्या नावाचं, हे योग्य नव्हे.
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी भाष्य केलं. निकम म्हणाले, वसंतरावांच्या घरी नांदायचं. गळ्यात मंगळसूत्र पंडितरावांच्या नावानं घालायचं. उखाणा विलासरावांच्या नावानं घ्यायचा. गर्भ देवरावांचं वाढवायचं. अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. अशाप्रकारची गुंतागुंत जास्त वेळ लांबणं योग्य नाही. यावर ताबडतोब निर्णय झाला पाहिजे.
राज्यात सध्या मोठ्या घडामोडी सुरु आहेत. त्यावर उज्ज्वल निकम म्हणाले की, उपसभापती हे विधानसभेचे कामकाज पाहतात. यादरम्यान त्यांना सभापतीचे अधिकार असतात. जर उपसभापतीवर अविश्वास दाखविला आणि तो जर फेटाळला गेला तर दाद मागण्यासाठी न्यायालयात जावे लागेल. त्यावर काय निकाल देते हे त्या निकालावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सध्या विचित्र परिस्थिती महाराष्ट्रात झालेली आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. कारण पावसाळा तोंडावर आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे. यासाठी सरकारला ताबडतोब काहीतरी करून या सरकारला स्थिर करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. असं सूचक वक्तव्य उज्ज्वल निकम यांनी केलंय.