उल्हासनगर : उल्हासनगर शहरात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. माजी आमदार पप्पू कलानी यांच्या सूनबाई आणि उल्हासनगर महापालिकेच्या माजी महापौर पंचम ओमी कलानी यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर टीम कलानीच्या 22 नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा पक्षप्रवेश झाला.
पंचम कलानी या तांत्रिकदृष्ट्या भाजपच्या चिन्हावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. आता राष्ट्रवादी प्रवेशापूर्वी पंचम कलानी यांनी उल्हासनगरचे महापालिका आयुक्त राजा दयानिधी यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. टीम ओमी कलानीच्या भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या 22 नगरसेवकांनी हातावर ‘घड्याळ’ बांधले आहे.
उल्हासनगर महापालिकेवर आता राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला. कलानी परिवाराच्या प्रवेशामुळे शहरात पक्षाला बळ मिळेल, असंही आव्हाड म्हणाले. कलानी गटाचे 22 आणि इतर 10 अशा 32 नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे.
भाजपसाठी मोठा हादरा मानला
आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी मोठा हादरा मानला जात आहे. मागील निवडणुकीत हे 22 नगरसेवक भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. मात्र यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांची पप्पू कलानींशी चर्चा
पप्पू कलानी जेलच्या बाहेर आल्यानंतर उल्हासनगरातील राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहे. चारच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरात जाऊन पप्पू कलानी यांची भेट घेतली होती. रात्री साडेतीन वाजेपर्यंत नेत्यांची चर्चा चालली होती.
माजी आमदार पप्पू कलानी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. उल्हासनगरात निवडणुकीपूर्वी मोठा राजकीय भूकंप होताना दिसत आहे.
टीम कलानींचं महाविकास आघाडीला मतदान
उल्हासनगर महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या प्रभाग समिती निवडणुकीत भाजपच्या (टीम ओमी कलानीच्या) सात नगरसेवकांनी महाविकास आघाडीला मतदान केलं होतं. त्यामुळे भाजपला सर्व समित्या गमवाव्या लागल्या होत्या. टीम ओमी कलानीच्या 9 नगरसेवकांनी महाविकास आघाडीला मतदान करत शिवसेनेच्या लीलाबाई आशान यांना महापौर म्हणून निवडून आणलं. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. हे नगरसेवक टीम ओमी कलानीचे असले, तरी ते भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले असल्यानं तांत्रिकदृष्ट्या ते भाजपचे होते. त्यामुळे त्या 9 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करत भाजप जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी यांनी याचिका दाखल केली होती.
संबंधित बातम्या :
उल्हासनगर महापालिकेत भाजप आणि टीम ओमी कलानीत राडा, आमदार रविंद्र चव्हाणांच्या समोरच गदारोळ