नवी दिल्ली : माधवराव शिंदे भाजपमध्ये यावेत, ही आजी विजया राजे शिंदे यांची अपूर्ण राहिलेली इच्छा ज्योतिरादित्य शिंदे यांनी पूर्ण केली, असे उद्गार भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा उमा भारती यांनी काढले आहेत. काँग्रेसमध्ये अनेक मंत्रिपदं भूषवलेले वडील माधवराव शिंदे यांच्या 75 व्या जयंतीलाच ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. (Uma Bharti says Jyotiraditya Scindia completed his Grandmothers wish)
माधवराव शिंदे यांच्या मातोश्री विजया राजे शिंदे यांनी 1957 मध्ये मध्यप्रदेशातील गुना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तेव्हापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे त्या भारतीय जनसंघात गेल्या. नंतर भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली.
(4) @JM_Scindia जी की दादी की भी इच्छा थी कि श्री माधवराव जी @BJP4India में रहें उनकी इच्छा ज्योतिरादित्य जी ने पूरी की है।
— Uma Bharti (@umasribharti) July 6, 2020
विजया राजे आणि पुत्र माधवराव यांच्यात मालमत्तेवरुन सार्वजनिक वादही झाले. त्यांच्या भिन्न राजकीय विचारसरणीमुळे वैर वाढत गेले. मात्र माधवराव यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये यावे, ही विजया राजे यांची इच्छा होती, असे उमा भारती यांनी बोलून दाखवले.
माधवराव शिंदे यांचा प्रवास
माधवराव शिंदे हे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये राज्य करणाऱ्या मराठा-शिंदे घराण्याचे वंशज होते. ग्वाल्हेरचे अखेरचे महाराजा जिवाजीराव शिंदे यांचे ते सुपुत्र. माधवरावांचं शिक्षण सिंधिया शाळेतच झालं, तर ऑक्सफर्डमध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतलं.
ब्रिटनहून परत आल्यावर माधवरावांनी मातोश्री विजया राजे शिंदे यांची राजकारणात प्रवेश करण्याची परंपरा पाळली. 1971 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी माधवराव शिंदे पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. जन संघाच्या तिकीटावर ते गुणा मतदारसंघातून खासदार झाले. आणीबाणी उठल्यानंतर 1977 साली झालेल्या निवडणुकीत माधवराव शिंदे पुन्हा निवडून आले. देशात जनता पक्षाची लाट असतानाही अपक्ष लढलेल्या शिंदेंना यश आलं.
हेही वाचा : शिवराजसिंह सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, 28 पैकी 12 मंत्री शिंदे गटाचे
1980 मध्ये माधवराव शिंदे काँग्रेसमध्ये सामील झाले आणि तिसऱ्यांदा गुणा मतदारसंघातून निवडून आले. 1984 मध्ये भाजप उमेदवार असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांना पराभूत करण्यासाठी अखेरच्या क्षणी माधवराव शिंदेंना ग्वाल्हेर मतदारसंघातून निवडणुकीत उतरवण्याची खेळी काँग्रेसने केली. त्यावेळी माधवराव मोठ्या मताधिक्याने निवडून आले. माधवरावांना निवडणुकीत एकदाही पराभवाचा सामना करावा लागला नाही. ते तब्बल नऊ वेळा लोकसभेवर निवडून गेले.
हेही वाचा : मध्य प्रदेशात काँग्रेसला हादरा, ज्योतिरादित्य शिंदेंचा राजीनामा, वडिलांच्या जयंतीलाच वादळी निर्णय
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात 1986 मध्ये माधवराव शिंदेंना पहिल्यांदा केंद्रात मंत्रिपद मिळालं. रेल्वे मंत्रालयाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. त्यानंतर पीव्ही नरसिम्हा राव यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी शिंदेंकडे सोपवली होती. मात्र 1992 मध्ये झालेल्या विमान अपघातामुळे त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. अखेर, 1995 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा पदभार देऊन त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. माधवराव शिंदे यांनी 1990 ते 1993 या काळात ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपदही भूषवलं आहे.
हेही पहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!
उत्तर प्रदेशातील मणिपुरी जिल्ह्यात झालेल्या विमान अपघातात माधवराव शिंदे यांचं अकाली निधन झालं. 30 सप्टेंबर 2001 रोजी वयाच्या 56 व्या वर्षी त्यांची अखेर झाली. शिंदे प्रवास करत असलेलं खाजगी विमान कोसळून आठही जणांचा मृत्यू झाला. यामध्ये त्यांचे स्वीय सचिव रुपिंदर सिंह, ‘इंडियन एक्स्प्रेस’चे पत्रकार संजीव सिन्हा, ‘हिंदुस्थान टाइम्स’च्या पत्रकार अंजू शर्मा आणि गोपाल बिष्ट, ‘आज तक’चे पत्रकार रंजन झा, पायलट राय गौतम आणि को-पायलट रितू मलिक यांचा समावेश होता.
(Uma Bharti says Jyotiraditya Scindia completed his Grandmothers wish)