अहमदाबाद : भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुजरातमधील अहमदाबादच्या खासगी रुग्णालयात अमित शाह (Amit Shah) अॅडमिट झाले आहेत. अमित शाहांवर छोटी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांच्या 4 ते 5 प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या झाल्या.
अमित शाह यांच्यावर के डी रुग्णालयात (KD hospital) शस्त्रक्रिया होणार आहे. मात्र ही नेमकी कोणती शस्त्रक्रिया आहे याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.
अमित शाह हे नुकतंच महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. अमित शाह हे एक तारखेला सोलापुरातील भाजपच्या महाजनादेश यात्रेला उपस्थित होते. यानंतर ते मुंबईत लालबाग, सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनाला आले होते. तिथून ते दिल्लीला रवाना झाले.
अमित शाह बुधवारी म्हणजे आज गुजरातला वैयक्तिक कारणांसाठी जाणार असल्याचं सांगण्यात येत होतं. त्याचं कारण अस्पष्ट होतं. मात्र आज ते गुजरातमध्ये उपचारासाठी आल्याचं स्पष्ट होत आहे.
अमित शाहांचा हा गुजरात दौरा या आठवड्यातील दुसरा दौरा आहे. यावेळी ते कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत होतं.
लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वाईन फ्लू
दरम्यान अमित शाह यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वाईन फ्लू झाला होता. स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याने अमित शाह यांना 16 जानेवारी रोजी तातडीने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर चार दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 16 जानेवारी रोजी अमित शाह यांना अचानक ताप आला आणि ताप वाढत गेला. त्यामुळे त्यांना तातडीने एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. शाह यांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे निदान झाले होते.
संबंधित बातम्या
होय, अमित शाहांनी जिथून टीका केली, ते मैदान पवारांनीच बांधलंय
अमित शाहांची सोलापुरात शरद पवारांवर टीका; आता नातवाचं शाहांना उत्तर