बीडः शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या राजकीय (Maharashtra politics) वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असून ईश्वर त्यांच्या कुटुंबाला या धक्क्यातून सावरण्याची प्रेरणा देवो, असा शोकसंदेश देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी पाठवला आहे. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या नावाने हा संदेश आज मिळाला असून अमित शहांनी मेटे यांच्या कुंटुबियांची सांत्वना केली आहे. 14 ऑगस्ट रोजी विनायक मेटे यांच्या कारचा भीषण अपघात झाला. बीडहून मुंबईच्या दिशेने जात असताना सकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या कारला आयशरची धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की घटनेनंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या नावाने शोकसंदेशाचे पत्र पाठवले. त्यात त्यांनी लिहिलेय, विनायक मेटे यांच्या निधनाची दुःखद बातमी ऐकून मी व्यथित झालो. महाराष्ट्राच्या राजकारणाचे कधीही भरून न निघाणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल मी खेद व्यक्त करतो. दिवंगत आत्म्याला नम्रपणे श्रद्धांजली अर्पण करत ईश्वराकडे प्रार्थना करतो.. शोकाकूल कुटुंबाला आणि समर्थकांना या संकटात धीराने सामोरे जाण्याची शक्ती प्रदान करो… अशा आशयाचा हिंदी भाषेतील शोक संदेश अमित शहा यांनी पाठवला आहे.
विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूबाबत अनेक राजकीय नेत्यांनी संशय व्यक्त केला आहे. तर मेटे यांच्या पत्नीनेदेखील असेच आरोप केले आहेत. यापूर्वीदेखील विनायक मेटेंचा दोन गाड्यांनी पाठलाग केला होता, असा गौप्यस्फोट मेटे यांचे सहकारी अण्णासाहेब मायकर यांनी केला आहे. त्यांच्या बोलण्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. मायकर हे 3 ऑगस्ट रोजी मेटे यांच्यासोबत प्रवास करत होते. तेव्हा शिक्रापूरहून दोन किमी अंतरापर्यंत दोन गाड्या पाठलाग करत होत्या. यात आयशर ट्रकदेखील होता. या गाड्या कधी मागे राहत होत्या तर कधी ओव्हरटेक करून पुढे जात होत्या, असं मायकर यांनी सांगितलं. दरम्यान, मायकर यांनी दिलेली माहिती तसेच मेटे यांच्या मृत्यूची संदिग्ध वेळ यावर खुलासा झालाच पाहिजे, अशी मागणी मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे.