मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत. मुंबईतील दादर टीटी भागात शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी नारायण राणे यांचा मोठा फोटो बॅनरवर लावला आहे. त्यावर “कोंबडी चोर !!!” असे नारायण राणेंना झोंबणारे शब्द लिहिले आहेत. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून याचे आणखी तीव्र पडसाद उमटण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोस्टरबाजीचा व्हिडीओ :
नारायण राणेंच्या अटकेचे आदेश
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याचे प्रकरण आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण, नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता नाशिक पोलिसांचे पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणच्या दिशेने रवाना झाले आहे. नारायण राणे सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. नाशिक पोलिसांचे पथक येथूनच नारायण राणे यांना ताब्यात घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता राणे समर्थकही आक्रमक होण्याची शक्यता आहे.
नारायण राणेंविरोधात कोणते आरोप?
नाशिक सायबर पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात कलम 500, 505 (2), 153-ब (1) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांबाबत बदनामीकारक वक्तव्य करणे, समाजात शत्रुत्व आणि द्वेषाची भावना निर्माण करणे, राज्यात विविध गटांत तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करणे, मुख्यमंत्र्यांवर बलप्रयोग करण्यास प्रवृत्त होतील असे वक्तव्य करणे यासारखे आरोप राणेंवर ठेवण्यात आले आहेत. गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्यापकता लक्षात घेत अटक करण्यासाठी पोलिसांची टीम तयार आहे. नाशिक पोलीस उपायुक्त संजय बरकुंड, तपास अधिकारी आनंदा वाघ यांच्या अध्यक्षतेत टीम कारवाई करणार आहे.
नाशिक पोलीस आयुक्तांचे आदेश काय?
सदर गुन्ह्यातील आरोपी नारायण राणे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे अटक केल्यानंतर उपराष्ट्रपतींना कळवलं जावं. अटकेची माहिती भारत सरकारला द्यावी. कारवाईवेळी राजशिष्टाचाराचं पालन करा, हक्कभंगाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आदेश नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत.
नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?
नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, नारायण राणेंना अटक करा, नाशिक पोलीस आयुक्तांचे निर्देश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पातळी सोडून टीका करणाऱ्या नारायण राणेंवर गुन्हा दाखल
Video : ‘मी असतो तर कानाखाली चढवली असती’, मुख्यमंत्र्यांवर बोलताना राणेंची जीभ घसरली
मुख्यमंत्र्यांबद्दल राणे म्हणाले, मी असतो तर कानाखाली चढवली असती, आता शिवसेनेचं जशास तसं उत्तर