“मला विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्याकडून पंतप्रधानपदाची ऑफर होती, पण…”, नितीन गडकरींचा धक्कादायक गौप्यस्फोट

| Updated on: Sep 15, 2024 | 10:58 AM

नितीन गडकरींच्या या विधानावरुन आता चर्चांना उधाण आले आहे. त्यातच हा नेता नेमका कोण, अशीही चर्चा रंगली आहे. नितीन गडकरींच्या या विधानमुळे सध्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

मला विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्याकडून पंतप्रधानपदाची ऑफर होती, पण..., नितीन गडकरींचा धक्कादायक गौप्यस्फोट
Follow us on

Nitin Gadkari on Prime Minister post : लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, पण पक्ष आणि विचारधारेसाठी मी तो प्रस्ताव नाकारला, असा धक्कादायक गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. नागपूरमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. नितीन गडकरींच्या या विधानावरुन आता चर्चांना उधाण आले आहे. त्यातच हा नेता नेमका कोण, अशीही चर्चा रंगली आहे. नितीन गडकरींच्या या विधानमुळे सध्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांमुळे सर्वच नेते मोर्चेबांधणीच्या तयारीला लागले आहेत. त्यातच काल नागपुरात एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी नेहमी प्रमाणेच जोरदार टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान पदाची ऑफर होती, याबद्दलचा किस्सा सांगितला.

नितीन गडकरी काय म्हणाले?

काही दिवसांपूर्वी एक घटना घडली. या घटनेतील नेत्याचे नाव मी तुम्हाला सांगणार नाही. पण त्याने मला सांगितले होते की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. त्यावर मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पंतप्रधान पदासाठी का पाठिंबा देणार आणि तो पाठिंबा मी का घ्यावा? मी त्या नेत्याला स्पष्टपणे सांगितलं की, पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे. मी पंतप्रधानपदासाठी तत्त्वांशी आणि पक्षाशी प्रतारणा करणार नाही. ही तत्त्वं हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे, असा किस्सा नितीन गडकरी यांनी सांगितला.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नितीन गडकरींनी सांगितलेल्या या किस्स्यानंतर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तसेच पुन्हा एकदा नितीन गडकरींची पंतप्रधानपदासाठी चर्चा सुरु झाली आहे. 2014 पासून नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त भाजपमध्ये इतर कोणीही पंतप्रधानपदासाठी दावा केलेला नाही. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार याची चर्चा पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्यानंतर योगी आदित्यनाथ, अमित शाह यांची नावे पंतप्रधानपदासाठी चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावर आता नितीन गडकरी यांच्या नावाची भर पडली आहे.