मुंबई : “रिपब्लिकन पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या पाठिशी आहेत. मुंबई ही सर्व पक्षाचा आणि सर्वांची आहे. मुंबईत राहण्याचा सर्वांना अधिकार आहे. कंगनाला मुंबईत घाबरण्याची गरज नाही,” अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. नुकतंच रामदास आठवले यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Ramdas Athawale meet Kangana Ranaut)
“माझं फर्निचर, वॉल तोडली आहे. मी कोर्टमध्ये जाणार आहे. मला महापालिकेकडून भरपाई मिळाय़ला हवी. कंगनानी मला या गोष्टी सांगितल्या. माझी कंगनासोबत खूप विषयावर चर्चा झाली. कंगनाला उगाच त्रास झाला आहे. त्यामुळे मी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहे. तसेच याप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा करणार आहे,” अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.
“कंगना ड्रग्स घेत होती हे सामनात कसं छापलं, असा प्रश्न रामदास आठवलेंनी उपस्थित केला. शिवसेना खासदार संजय राऊत आणि सामनावर केस व्हायला हवी,” असेही रामदास आठवले म्हणाले.
कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर एकेरी शब्दात केलेली टीका, शिवसेनेवर साधलेले शरसंधान, मुंबई महापालिकेने ऑफिसवर केलेली कारवाई यांसह इतर अनेक गोष्टींवर त्यांच्यात चर्चा झाली.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर फार गर्व आहे. माझं सौभाग्य आहे की तुम्ही आमच्या घरी आलात. तुमचा आशिर्वाद असू द्या. तुम्ही हिमाचलमध्ये कधी आलात तर तिथे आदरातिथ्य करण्याचा मला संधी द्या.” असे कंगना आठवलेंच्या भेटीदरम्यान म्हणाली.
तर शिवसेना फार अग्रेसिव्ह राहणार नाही, असे आठवले म्हणाले. त्यानंतर शिवसेना बॅक फूटवर येईल, असा दावा कंगनाने केला आहे.
गेल्या काही दिवसात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवलेंनी कंगनाची भेट घेण्याचा निर्णय घेतला. कंगनाच्या राहत्या घरी खार इथे त्यांनी भेट घेतली. कंगना आणि रामदास आठवले यांच्यात दीड तास चर्चा सुरु होती.
Maharashtra: Union Minister Ramdas Athawale arrives at the residence of actor #KanganaRanaut, in Mumbai. pic.twitter.com/RuIGbNuUQP
— ANI (@ANI) September 10, 2020
दरम्यान रामदास आठवले यांच्या भेटीपूर्वी कंगनाने पालिकेने कारवाई केलेल्या ऑफिसच्या तोडकामाची पाहणी केली. कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयावर काल महापालिकेचा हातोडा पडला. कंगनाच्या याचिकेनंतर हायकोर्टाने पाडकामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. तसेच पालिकेला आपले म्हणणे मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Maharashtra: Actor Kangana Ranaut arrives at her office in Mumbai, where demolition work was carried out by BMC, yesterday. pic.twitter.com/cvOMuI8wXa
— ANI (@ANI) September 10, 2020
हेही वाचा – मुंबई कुण्या एकट्याच्या बापाची जहागिरी नाही : रामदास आठवले
दरम्यान कंगनाच्या भेटीपूर्वी रामदास आठवलेंनी तिचे समर्थन केले होते. “कंगनाने मुंबई बद्दल केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. पण ती एक महिला आहे तिच्याबद्दल अशी भाषा वापरणं चुकीचं आहे. महिला म्हणून तिला संरक्षण देणं आमची नैतिक जबाबदारी आहे. मुंबईने अनेकांना जगवलं आहे. मुंबई काही कोण्या एकट्याच्या बापाची जहागिरी नाही”, असं रामदास आठवले म्हणाले.
“मुख्यमंत्र्याबद्दल एकेरी शब्दात उल्लेख ती चिडली असल्यामुळं केला. पण, असा एकेरी उल्लेख करणं योग्य नाही. शिवसेना आणि अनेक पार्टीची कार्यालयं अवैध आहेत. ती तुम्ही तोडणार आहात का? मुख्यमंत्रांबद्दल बोलताना आदरपूर्वक बोललं पाहिजे. अशा प्रकारे सूडबुद्धीने कारवाई करणं योग्य नाही. 52 हजार कामं मुंबईत अवैध आहेत, ती तुम्ही तोडणार आहात का?”, असा प्रश्नही रामदास आठवले यांनी उपस्थित केला
“कंगनाचं ऑफिस तोडायला नको होतं. याआधी का तिच्यावर कारवाई केली नव्हती? शरद पवारांच्या काळात बांधकाम झालं याबाबद्दल मला माहित नाही. तिला माहित असेल म्हणून ती बोलली असेल. दाऊदची इमारत देखील अवैध असल्याचं सांगितलं. मग ती का तोडत नाहीत? तिच्या घराला हात लागता कामा नये”, असंही रामदास आठवले म्हणाले. (Ramdas Athawale meet Kangana Ranaut)
संबंधित बातम्या :
Kangana Office Demolish | बीएमसीची ऑफिसवर कारवाई, कंगनाकडून बाबर आणि पाकिस्तानशी तुलना