मनसुख हिरेन प्रकरणाच्या तपासाची गाडी ATS का दामटवतंय? भाजपचा सवाल, पवारांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

| Updated on: Mar 23, 2021 | 5:34 PM

या प्रकरणाचा तपास एनआयएकडे का दिला जात नाही? एटीएस या प्रकरणाच्या तपासाची गाडी का दामटवत आहे? असा सवाल भाजप नेते आणि केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी विचारलाय.

मनसुख हिरेन प्रकरणाच्या तपासाची गाडी ATS का दामटवतंय? भाजपचा सवाल, पवारांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
रविशंकर प्रसाद यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केलीय.
Follow us on

नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेला मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करायचा आहे. पण महाराष्ट्र एटीएसकडून हिरेन प्रकरणाचा उलगडा झाल्याचं एटीएसमधील अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. पण आज झालेल्या एटीएसच्या पत्रकार परिषदेत ठोस काही सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास एनआयएकडे का दिला जात नाही? एटीएस या प्रकरणाच्या तपासाची गाडी का दामटवत आहे? असा सवाल भाजप नेते आणि केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी विचारलाय.(Union Minister Ravi Shankar Prasad’s criticism of Chief Minister Uddhav Thackeray and Sharad Pawar)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एक डेटा बॉम्ब टाकला. यावेळी फडणवीसांनी राज्यातील पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्यामार्फत पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटबाबतचा एक अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता. तसेच या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची शिफारसही करण्यात आली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, असं सांगतानाच या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी आज राज्याच्या गृहसचिवांना भेटणार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

..तर बाकी मंत्र्यांचं किती असेल?

फडणवीसांनी हा डेटा बॉम्ब टाकल्यानंतर रविशंकर प्रसाद यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. भारताच्या इतिहासात पहिल्यादांच असं पाहायला मिळत आहे. एक पोलीस आयुक्त राज्याच्या गृहमंत्र्यांवर 100 कोटी वसुलीच्या टार्गेटचा आरोप करतोय. जर एका मंत्र्याचं टार्गेट 100 कोटीचं असेल तर बाकी मंत्र्यांचं किती असेल? असा सवाल रविशंकर प्रसाद यांनी विचारलाय.

तपास एनआयएकडे का दिला जात नाही?

महाराष्ट्रासारख्या राज्यात मोठ्या अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगमध्ये वसुली होत आहे. तेव्हा आम्हाला वाटलं मुख्यमंत्री कारवाई करतील. पण दोषींवर कारवाई करण्याऐवजी एक इमानदार महिला अधिकाऱ्याला डिफेन्सचा डीजीपी बनवण्यात आलं. एका उद्योगपतीच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी मिळाली. त्याचा तपास एनआयए करत आहे. त्या गाडीता तथाकथित मालक मृतावस्थेत सापडतो. मग त्याचा तपास एनआयएकडे का दिला जात नाही? असा प्रश्नही प्रसाद यांनी विचारला आहे.

शरद पवारांवर ही वेळ का आली?

शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली. त्यावेळी त्यांनी देशमुखांच्या रुग्णालयातील उपचाराच्या रेकॉर्डचा हवाला दिला. पण देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री देशमुख यांनी 15 फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेचा दाखला देत पवारांचा दावा खोडून काढला. त्यावरुनही रविशंकर प्रसाद यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. पवारसाहेब, तुम्ही देशाला सांगायला हवं की, चुकीच्या तथ्याचा आधार घेत तुम्हाला अनिल देशमुख यांना का डिफेन्ड करावं लागलं? असा प्रश्न प्रसाद यांनी विचारलाय. पवारांनी त्यांच्या लौकिकाला साजेसं काम करावं. त्यांनी देशमुखांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही प्रसाद यांनी यावेळी केली आहे.

संबंधित बातम्या :

देशमुखांबद्दलचे पवारांचे एक एक दावे, फडणवीसांनी पुराव्यानिशी खोडले, वाचा प्रेसमध्ये काय काय बोलले?

रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट, बेकायदेशीरपणे विरोधकांचे फोन टॅप करायच्या; राष्ट्रवादी काँग्रेसचा पलटवार

Ravi Shankar Prasad’s criticism of Chief Minister Uddhav Thackeray and Sharad Pawar