नवी दिल्ली : सातव्या टप्प्यातील मतदानापूर्वीच यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत. निकाल 23 मे रोजी लागणार असला तरी एनडीएच्या विरोधात असलेल्या सर्व प्रमुख पक्षांना एकत्र आणून गैरभाजपा सरकार स्थापन करण्यासाठी जुळवाजुळव सुरु झाली आहे. दक्षिण भारतात तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांच्याकडून तिसऱ्या मोर्चाचे प्रयत्न सुरु झाल्यानंतर काँग्रेसनेही आता जमवाजमव सुरु केली आहे. सोनिया गांधींनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.
विरोधी पक्षांचे प्रमुख नेते 22, 23 आणि 24 मे रोजी राजधानी दिल्लीत आहेत की नाही, याबाबतची माहिती सोनिया गांधींनी फोनवरुन घेतली आहे. सर्व पक्ष पंतप्रधान मोदींविरोधात आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाणार आहे. निवडणुकीपूर्वी हे पक्ष एकत्र आले नसले तरी निवडणुकीनंतर मोदीविरोध दाखवण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्त्वात या सर्व पक्षांची बैठकही होऊ शकते.
सूत्रांच्या माहितीनुसार, या सर्व अभियानाची जबाबदारी कमलनाथ यांच्यावर देण्यात आली आहे. सर्व पक्षांशी संपर्क साधून त्यांना यूपीएत सहभागी होण्याचं निमंत्रण देण्याची जबाबदारी कमलनाथ यांच्यावर असेल. एकीकडे भाजपने पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करण्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे काँग्रेसनेही सत्तास्थापनेसाठी निकालाआधीच प्रयत्न सुरु केले आहेत.
कमलनाथ यांना काँग्रेसमध्ये मोठं महत्त्व आहे. त्यामुळेच मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. मोदींचा कार्यकाळ अवघा काही दिवसांचाच उरला असल्याचं त्यांनी काही दिवसांपूर्वी एका सभेत म्हटलं होतं. मध्य प्रदेशात 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ला होता. पण यावेळी मध्य प्रदेशातून काँग्रेसला मोठी अपेक्षा आहे.