मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा देत महाआघाडीची घोषणा करण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असलेल्या विविध पक्षांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. 48 पैकी काँग्रेस 24 आणि राष्ट्रवादी 20 जागा लढणार आहे. यापैकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून मित्रपक्षांना प्रत्येकी दोन अशा चार जागा देणार आहे.
राजू शेट्टी सध्या हातकणंगलेतून खासदार आहेत. त्यामुळे ती जागा राष्ट्रवादीकडून स्वाभिमानीला देण्यात आली आहे. शिवाय सांगली, अकोला किंवा वर्धा यापैकी एक जागा काँग्रेसच्या कोट्यातून दिली जाणार आहे. दुसरीकडे पालघरची जागा बहुजन विकास आघाडीला मिळणार आहे. तर अमरावतीची जागा अपक्ष आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानीकडून लढण्यासाठी पत्नी नवनीत कौर राणा यांच्यासाठी अमरावतीची जागा सोडली जाणार आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात 26-22 असा फॉर्म्युला ठरला होता. पण मित्रपक्षांना यापैकी दोन्ही पक्षांना आपापल्या कोट्यातून चार जागा दिल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठीही आघाडीकडून प्रयत्न करण्यात आले होते. पण भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी जागावाटपावरुन न जमल्याने दोन्ही गटांनी अखेर स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.
अजित पवारांचा वंचित बहुजन आघाडीवर निशाणा
महाआघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. महाआघाडीत ने आलेले पक्ष भाजपची बी टीम आहेत, असा आरोप अजित पवारांनी केला. आघाडीकडून विरोधी पक्षांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. पण काही ना काही कारण काढून महाआघाडीत न येणारे भाजपची बी टीम आहेत, असं अजित पवार म्हणाले.
महाआघाडीत कोण किती जागा लढणार?
काँग्रेस – 22
राष्ट्रवादी – 20
स्वाभिमानी शेतकरी संघटना – 02
बहुजन विकास आघाडी – 01
युवा स्वाभिमानी – 01