Photo | कोव्हिड काळात उद्धवजींनी महाराष्ट्र सांभाळला, महाविकास आघाडीचं काम वाखणण्याजोगं : उर्मिला मातोंडकर
Follow us on
शिवसेना पक्षप्रवेशानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर आपली मतं मांडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामाचं कौतुक केलं तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर स्तुतीसुमने उधळली. कोव्हिड काळात उद्धवजींनी महाराष्ट्र सांभाळला तसंच महाविकास आघाडीचं काम वाखणण्याजोगं आहे, असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.
ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या सरकारने कोणत्याही एका धर्माचं लांगूलचालन केलं नाही. सरकारने सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यातच सर्व काही आलं, अशी स्तुतीसुमने त्यांनी ठाकरे सरकारवर उधळली.
शिवसेनेची महिला आघाडी भक्कम आहे. या महिला आघाडीमध्ये सहभागी होण्याचं भाग्य मला मिळालं. याबद्दल मी आनंदी आहे. तसंच मी शिवसैनिक म्हणून आलेली आहे, शिवसैनिक म्हणूनच काम करेन, असंही उर्मिला मातोंडकर यांनी स्पष्ट केलं.
बॉलिवूडला महाराष्ट्रापासून वेगळं करणं कठीण आहे, असं म्हणत त्यांनी योगींवर निशाणा साधला. तर शिवसेना प्रवेश जरी केलेला असला तरी कंगनाच्या टीकेला उत्तर देणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. कंगनावर याआधीच गरजेपेक्षा जास्त बोललं गेलं आहे. त्यामुळे तिच्यावर बोलणार नाही, असं त्या म्हणाल्या.
उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्या नक्कीच महाराष्ट्राची उत्तम सेवा करतील, असं म्हणत त्यांच्या राजकीय कारकीर्दीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.