मुंबई : काँग्रेसच्या उत्तर मुंबईतील उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी हिंदुत्वावर वक्तव्य केलं आहे. त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत ते देश तोडण्याचं काम करत आहेत, तसेच त्यांचं हिंदुत्व हे हिंसाचारावर आधारित असल्याचं उर्मिला यांनी सांगितलं. बोरीवलीमध्ये काँग्रेस गुजराती सेलतर्फे आयोजित सभेमध्ये उर्मिला यांनी हे वक्तव्य केलं.
“गुजरातने या देशाला काय दिलं? गुजरातने या देशाला महात्मा गांधी आणि सरदार वल्लभ भाई पटेल दिले. गुजरातने या देशाला ते हिंदुत्व दिलं जे महात्मा गांधींचं हिंदुत्व आहे. जे खरोखर हिंदुत्व होतं. ते हिंदुत्व हिंसा किंवा द्वेषावर आधारित नव्हतं. जे एकमेकांचे गळे कापून त्याचा व्हिडीओ काढून लोकांपर्यंत पोहोचवेल, असं ते हिंदूत्व नव्हतं. या हिंसाचाराच्या राजकारणात लोकांना नशेच्या आहारी करत देश विनाशाकडे नेणारं हे हिंदुत्व आहे. त्यामुळे माझ्या मते हिंसक हिंदुत्वाला अर्थ नाही. आज धर्म, जातीच्या नावावर देशाला विभाजित केलं जात आहे. आज पाच वर्षांनी देशात विकास तर झाला नाही. पण, देश आज त्या स्थितीत येऊन पोहोचला आहे, जिथे त्याचे अनेक तुकडे व्हायला वेळ नक्कीच लागणार नाही. आज आपल्याला या काँग्रेसला सत्तेत आणायचं आहे, जेणेकरुन ते देशाला एकत्र ठेवतील आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जातील”, असे उर्मिला त्यांच्या भाषणात म्हणाल्या.
“तुम्ही त्या हिंदुत्वासोबत उभे राहा जे गांधीजींनी या देशाला दिलं. त्या हिंदुत्वासोबत नाही जे फक्त पाच वर्ष जुनं आहे”, असा टोला उर्मिला यांनी भाजपला लगावला.
उर्मिला यांनी नोटाबंदीवरुनही मोदी सरकारला घेरलं. त्यांनी नोटाबंदीला भयानक राक्षस म्हटलं. “मी तुम्हाला त्या दिवसाची आठवण करवून देते, जेव्हा रात्री आपण सर्व सुखाने झोपलो होतो आणि सकाळी उठलो तेव्हा नोटाबंदी हा भयानक राक्षस आपल्या समोर येऊन उभा होता. तो कमी होता की काय, म्हणून अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडण्यासाठी जीएसटी कर आपल्यावर लादण्यात आला. या सर्वांमुळे आपला देश ते जास्त काळ सांभाळू शकतील, असं मला वाटत नाही”, अशा शब्दांत उर्मिला यांनी मोदी सरकारच्या योजनांवर टीका केली.
उर्मिला यांच्या हिंदुत्वाच्या वक्तव्यावर उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी सडकून टीका केली. “हिंदुत्वावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी एकदा ‘हिंदू दहशतवाद’ असा शब्द वापरला होता. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. हे वक्तव्य उर्मिला यांचं नाही. ते त्यांना काँग्रेसने लिहून दिलं आहे आणि त्या बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचा विरोध हा विरोधीपक्षाच्या त्या लोकांना आहे, ज्यांनी देशाला लूटलं, ज्यांनी देशाचा सन्मान कमी केली. मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा मान वाढवला”.
गोपाळ शेट्टींनी शरद पवारांवरही निशाणा साधला. त्यांनी पवारांना बॉस म्हणून संबोधलं. “हिंदू दहशतवाद यांच्याकडून (काँग्रेस-राष्ट्रवादी) येतो. शरद पवार त्यांचे बॉस आहेत. हिंदू हा इतका शांत प्राणी आहे, की संपूर्ण देशात त्याचा गौरव केला जातो. तो कुणाला त्रास देत नाही. पण, मुद्दाम कुणी आमची छेड काढण्याचा प्रयत्न करेल तर मोदी कशाप्रकारे यांना झटका देतात हे त्यांना माहित आहे. ”