मुंबई : सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहे. काही दिवसांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी देशातील सर्व विरोधक एकत्र येऊन जोमाने प्रचार करत आहेत. मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने एक धक्कादायक अहवाल अमेरिकन सिनेटला सादर केला आहे. भारतात दंगली उसळू शकतात असं या अहवालात म्हटलं आहे. “भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर जोर दिला, तर भारतात जातीय किंवा धार्मिक दंगली घडू शकतात”, अशी भीती अमेरिकन गुप्तचर अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या गुप्तचर विभागाकडून हा अहवाल सादर करण्यात आला आहे. या विभागाकडून जगभरात निर्माण होणाऱ्या संकटावर अभ्यास केला जातो आणि त्याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. हा अहवाल अमेरिकन सिनेट समोर सादर केला आहे.
या अहवालानुसार, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारतीय जनता पक्ष हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित करुन प्रचार करु लागला, तर भारतात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दंगल घडू शकते. धार्मिक दंगलीची शक्यता अधिक आहे”.
अमेरिकेत प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला गुप्तचर यंत्रणा अहवाल सादर करतात. त्यामध्ये जगभरातील घडामोडींचं मूल्यांकन केलं जातं. हा अहवाल तयार करण्याऱ्यांमध्ये अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा CIA चे संचालक जीना हास्पेल, एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर रे आणि डीआयएचे संचालक रॉबर्ट एश्ले यांचा समावेश होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भाजपशासित राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक तेढ निर्माण झाले. काही हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू राष्ट्रवादाच्या नावे काही छोट्या-मोठ्या हिंसा घडवल्या, असं अमेरिकीच्या गुप्तचर संघटनेचे संचालक डॅन कोट्स यांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे.
निवडणुकांपूर्वी दहशतवादी संघटनांना प्रोत्साहित केले जाऊ शकते किंवा भारत-पाकिस्तान संबंधात तणावपूर्ण वातावरण होऊ शकते. तसेच भारत-पाकिस्तान सीमेरेषेजवळ, सीमेपलिकडून, दहशतवाद्यांची घुसखोरी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तानचे संबंध बिघडतील, असा दावही या अहवालात केला आहे.