नाशिक : आगामी विधानसभेसाठी शिवसेना आणि भाजप हे जोरदार तयारीला लागले असतानाच, आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही जोरदार हालचालींना सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल (29 जून) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर आज (30 जून) नाशिकमध्ये काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसमध्ये सामील व्हावे अशी इच्छा बोलून दाखवली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितला बरोबर न घेतल्याने काँग्रेसला महाराष्ट्रात फटका बसला होता. त्यामुळे त्यांनी वंचितने सोबत यावं अन्यथा आमचंही नुकसान होईल आणि तुमचंही असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे.
लोकसभेच्या धक्कादायक निकालानंतर येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत येत्या आठवडाभरात जागावाटपाबाबत निर्णय घेण्यात येईल असे काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.
त्याशिवया येत्या निवडणुकीत काँग्रेसकडून नव्या चेहऱ्यांना उमेदवारी मिळणार आहे. त्यासाठी राज्यात काँग्रेसचे उमेदवार असलेल्या ठिकाणी मेळावा आयोजित करण्यात येईल. त्याशिवाय संपूर्ण जिल्ह्यातून उमेदवारी करणारे अर्ज मागवण्यात येणार असून त्यांच्या मेरीटटनुसार उमेदवारी देण्यात येईल असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.
त्याशिवाय या बैठकीत येत्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तसेच या बैठकीत वंचित बहुजन आघाडीनेही आमच्यात सामील व्हावे अशी इच्छाही अशोक चव्हाणांनी बोलून दाखवली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचितला सोबत न घेतल्याने महाराष्ट्रात चांगलाच फटका बसला होता. तर दुसरीकडे महाराष्ट्रात मतांचे विभाजन झाल्यामुळे भाजपला याचा फायदा झाला होता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीनेही आमच्यात सामील व्हावे, अन्यथा त्यांचेही नुकसान होईल आणि आमचंही असा सल्ला त्यांनी वंचितला दिला आहे.
तसेच शेतकऱ्यांची कर्ज माफी अजून झालेली नाही. तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतच आहे. असेही अशोक चव्हाणांनी सांगितले. त्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणा कागदावरच आहेत. आता बँकाही मुख्यमंत्र्यांचे ऐकत नाही. अशी खोचक टीका अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांवर केली. तसेच मराठा आरक्षण यश हे मराठा बांधवांनी काढलेले मोर्चे त्यांनी दिलेले बलिदान याला जाते, असा टोलाही अशोक चव्हाणांनी भाजप सरकारला लगावला.
संबंधित बातम्या :
प्रकाश आंबेडकरांची 50 जागांची मागणी, काँग्रेस मात्र 25 जागांसाठी राजी : सूत्र
अशोक चव्हाणांचा राजीनामा मंजूर होणार, महाराष्ट्रात ओबीसी चेहऱ्याला संधी?