मुंबई : वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम (Vanchit Bahujan Aghadi and AIMIM) यांच्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी फूट पडली आहे. एमआयएमने वंचित बहुजन आघाडीपासून (Vanchit Bahujan Aghadi and AIMIM) वेगळा होण्याचा निर्णय घेतलाय. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मान राखला नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत असल्याचं एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केलं.
गेल्या दोन ते चार दिवसांपासूनच एमआयएमकडून बाहेर पडण्याचे संकेत दिले होते. वंचितकडून आठ जागांची ऑफर होती, तर एमआयएम 100 जागांसाठी आग्रही होती. त्यामुळे अखेर बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही. त्यांनी फक्त आठ जागांची ऑफर दिली, जी कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. विशेष म्हणजे या यादीत औरंगाबाद मध्य मतदारसंघाचाही समावेश नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत, असं एमआयएमने जाहीर केलंय.
एमआयएमचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांची आणि प्रकाश आंबेडकरांची जागा वाटपाबाबत बैठक झाली, शेवटची बैठक 5 सप्टेंबरला झाली. प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना मेल लिहून 8 जागा देत असल्याचं कळवलं. एमआयएमने 2014 ला 24 जागा लढवल्या, ज्यापैकी दोन ठिकाणी विजय मिळवला आणि आम्ही नऊ जागांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होतो. एमआयएमचे आज राज्यभरात दीडशेपेक्षा जास्त नगरसेवक आहेत, असं एमआयएमने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.
आम्ही प्रकाश आंबेडकरांना आदर करतो आणि तो कायम राहिल. त्यामुळे वंचितला निवडणुकीसाठी शुभेच्छा. जागा वाटपाबाबत एमआयएम समाधानी नसल्यामुळे स्वतंत्र निर्णय घेत आहे. लवकरच उमेदवारांच्या मुलाखतीचं वेळापत्रक जारी केलं जाईल, असं एम्तियाज जलील यांनी कळवलंय.