नवी दिल्ली: भाजपचे नेते आणि खासदार वरुण गांधी (varun gandhi) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनीही ही भेट झाल्याचं सांगतानाच या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचं सांगून राजकीय हवाबाजीला हवा दिली आहे. वरुण गांधी हे नक्कीच ते माझ्याकडे आले होते. बरेच दिवस भेटीसंदर्भात वेळ मागे पुढे होत होती. ते एका राजकीय पक्षाचे नेते असले, खासदार असले आणि गांधी कुटुंबाशी संबंधित असले तरी ती सदिच्छा भेट होती. कोणत्याही भेटीत राजकीय विषय निघत असतात. तसा या भेटीतही निघाला. पण ही भेट सदिच्छा भेटच होती, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. तसेच या पुढेही आम्ही एकमेकांना भेटणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं. राऊत यांचे काँग्रेस नेते राहुल गांधींशी (rahul gandhi) असलेले जवळचे संबंध आणि आता वरुण गांधी यांनी अचानक राऊत यांची भेट घेणं यामुळे राजकीय वर्तुळात अनेक कयास लगावले जात आहेत.
वरुण गांधी आणि आम्ही अनेक विषयावर चर्चा केली. वरुण गांधी हे उत्तम लेखक आहेत. छान पुस्तकं लिहितात. विचार करतात. अनेक विषयावर ते चांगल्या गप्पा मारतात. राजकीय विषय चर्चेत निघत असतात. उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत त्यांनी विशिष्ट भूमिका घेतली आहे. पण माझी आणि त्यांची भेट ही केवळ सदिच्छा भेट होती. वरुण गांधी आणि त्यांच्या कुटुंबाचे ठाकरे कुटुंबाशी घनिष्ठ संबंध होते. या पुढेही आम्ही भेटण्याचं ठरवलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करण्याचा ठराव राष्ट्रवादीच्या युवा कार्यकारिणीत करण्यात आला. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही या भूमिकेचं आधीच स्वागत केलं आहे. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. विरोधकांची एकजूट करायची असेल, भाजप विरोधकांना एकत्र आणायचं असेल तर पवार हे काम करू शकतात. त्याबाबत खात्री असल्याने या भूमिका पुढे येत असतात, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
भाजप खासदार वरुण गांधी आणि संजय राऊतांमध्ये तब्बल 3 तास चर्चा! नेमकं काय शिजतंय?