मुख्यमंत्र्यांच्या सरकारी बैठकीला आदित्य ठाकरेंचा मावसभाऊ

| Updated on: Dec 04, 2019 | 8:16 AM

मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर म्हणजेच 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीला सरदेसाई उपस्थित राहिल्याचं वृत्त आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सरकारी बैठकीला आदित्य ठाकरेंचा मावसभाऊ
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या सरकारी बैठकीला आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आणि युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी हजेरी लावल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. बैठकीतील सरदेसाई यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार (Varun Sardesai in governmental Meeting) उघडकीस आला.

वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेचं सचिवपद असलं, तरी ते ना लोकप्रतिनिधी आहेत, ना सरकारी अधिकारी. त्यामुळे पर्यटन विषयक बैठकीला सरदेसाईंनी हजेरी लावल्यामुळे आयएएस अधिकारीही बुचकळ्यात पडल्याचं वृत्त आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर म्हणजेच 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीला सरदेसाई उपस्थित राहिल्याचं वृत्त आहे.

वरुण सरदेसाई राज्य शासनाच्या सचिवांच्या बैठकीत काय करत आहेत? तेही मंत्रालयात, असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलं असल्यामुळे आपण बैठकीला उपस्थित राहिलो होतो, असं स्पष्टीकरण वरुण सरदेसाई यांनी (Varun Sardesai in governmental Meeting) दिलं आहे.

कोण आहेत वरुण सरदेसाई?

वरुण सतीश सरदेसाई हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या भगिनीचे पुत्र. वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेच्या सचिवपदाची जबाबदारी आहे, तसंच वरुण यांच्याकडे शिवसेनेच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. सरदेसाईंनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आहे.

आदित्य ठाकरेंचा मावसभाऊ वरुण सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात?

आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी जाहीररित्या सर्वप्रथम मागणी वरुण यांनीच केली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरुण सरदेसाई हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनात वरुण सरदेसाई यांचा मोठा सहभाग होता.

गेल्या वेळी मुंबई सिनेट निवडणुकीच्या युवासेनेच्या व्यूहरचनेत वरुण सरदेसाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सर्व 10 जागा जिंकून युवासेनेने विक्रम रचला होता.

2017 मधील कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पेलली होती. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदेंसाठी त्यांनी प्रचार केला होता.

वरुण सरदेसाई हे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चिन्हं होती. युतीच्या जागावाटपात शिवसेनेने आग्रहाने भाजपकडून कल्याण पश्चिम मतदारसंघ मागून घेतला होता. परंतु, सरदेसाई यांनी विधानसभेला नशीब आजमावलं नाही, अन्यथा दोन्ही मावसभावांची एकत्र विधानसभेत एन्ट्री होऊ शकली असती.

Varun Sardesai in governmental Meeting