मुंबई : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचा अपमान करत आहेत. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही, आम्ही राहुल गांधींचा निषेध करतो, असे म्हणत आता राज्यभरात राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन केलं जाईल. तर दुसरीकडे प्रत्येक विधानसभा मतदार संघात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनचरित्राला उजाळा देणारी सावरकर गौरव यात्रा काढली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी केली. सह्याद्री अतिथीगृह येथे आज एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसला खडे बोल सुनावणाऱ्या उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे घेरण्याची रणनीती यानिमित्ताने आखल्याचं दिसून येतंय. केवळ शब्दातून टीका नको तर कृतीतून तुमचं सावरकर प्रेम दाखवून द्या, असं आव्हानच एकनाथ शिंदे यांनी दिलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची मोठी कोंडी होण्याची चिन्ह आहेत. तर राहुल गांधींविषयीची सहानुभूती कमी करण्याचाही प्रयत्न यातून केला जाऊ शकतो.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून आता भाजपने नवी रणनीती आखल्याचं दिसून येतंय. शिंदेसेनेला सोबत घेत राज्यभरात सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी तसेच काँग्रेसविरोधात आंदोलन केलं जाईल. यावेळी काँग्रेससोबत मविआमध्ये असलेल्या उद्धव ठाकरेंनाही टार्गेट केलं जाईल. तर दुसरीकडे हिंदुत्वाचा मुद्दा पुढे नेण्यासाठी सावरकर गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. एकूणच हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत एकाच रणनीतीत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना टार्गेट करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसून येतोय.
एकनाथ शिंदे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत थेट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दाखवला. सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांना बाळासाहेब ठाकरे यांनी थोबाडीत लगावलं होतं, हे दाखवलं. आता उद्धव ठाकरे राहुल गांधी यांना अशाच प्रकारे थोबाडीत मारणार का, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केलाय.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रात सावरकरांच्या मुद्द्यावरून मोठी रणनीती आखल्याचं दिसून येतंय. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्याने काही ठिकाणी त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे. सावरकरांचा अपमानाचा मुद्दा समोर करत पुन्हा एकदा हा प्रभाव पुसून टाकण्याचे प्रयत्न होतील. तर काँग्रेससोबत मविआत बसणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आणखी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजेच सावरकरांचा एक मुद्दा, शिवसेना आणि काँग्रेस असे दोन टार्गेट, असेच डावपेच भाजपने आखल्याचं दिसून येतंय.