“राजकारणातून मला 3 वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न”, विखेंच्या आत्मचरित्रातील 10 मोठे गौप्यस्फोट

| Updated on: Oct 15, 2020 | 10:49 AM

दिवंगत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी आपल्या आत्मचरित्रात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. यात राजकारणातून मला 3 वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

राजकारणातून मला 3 वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न, विखेंच्या आत्मचरित्रातील 10 मोठे गौप्यस्फोट
Follow us on

अहमदनगर : पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते झालं. यानंतर या आत्मचरित्राची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. बाळासाहेब विखे यांचं सर्वाधिक आयुष्य काँग्रेस पक्षात गेलं, मात्र त्यांना काँग्रेसमध्ये अनेकदा अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागल्याचा दावा या आत्मचरित्रात करण्यात आला आहे (Balasaheb Vikhe write 10 big claims in his autobiography attempts of murder).

शरद पवार आणि बाळासाहेब विखे यांच्यातील वाद, शिवसेनेत जाण्याचा आणि सेना सोडण्याचा निर्णय, राजीव गांधी यांच्या विरोधात फोरम का निर्माण करावा लागला?, बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व कसे होते, मनोहर जोशी आणि शरद पवार यांची मैत्री, आणि आयुष्यात 3 वेळा जीवे मारण्याचा झालेला प्रयत्न अशा अनेक मुद्द्यांवर बाळासाहेब विखे यांनी प्रकाश टाकला आहे.

1. राजकारणातून 3 वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न

बाळासाहेब विखे यांनी आपल्या आत्मचरित्रात अनेक राजकीय गौप्यस्फोटही केले आहेत. शरद पवार यांच्या बाबतीत या आत्मचरित्रात अनेक प्रसंगी भाष्य करण्यात आलं आहे. यातून बाळासाहेब विखे यांचं शरद पवार यांच्या बरोबर कधीच पटलं नाही हे दिसून येतं. राजकारणामुळे माझ्यावर 3 वेळा कठीण प्रसंग आल्याची माहिती देताना मला 3 वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा मोठा गोप्यस्फोट विखे यांनी केलाय. विखे यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट केला, मात्र हा प्रयत्न कोणी केला हे जाहीर न सांगता सविस्तरपणे घटनाक्रम लिहिलेला आहे.

2. पुलोद सरकार स्थापन झाल्यानंतरच सत्तेसाठी आणि सत्तेपुरतं राजकारण करण्याची परंपरा

1978 मध्ये स्थापन झालेल्या पुलोद सरकारबाबत लिहिताना बाळासाहेब विखे म्हणतात, “पुलोद सरकार स्थापन झाल्यानंतरच सत्तेसाठी आणि सत्तेपुरतं राजकारण करण्याची परंपरा सुरु झाली.” शरद पवार यांना महाराष्ट्राच्या प्रश्नांची अतिशय चांगली समज आहे. पुलोद सरकारमध्ये ते मुख्यमंत्री झाल्यावर विकास कामांची गती वाढवण्याची त्यांची क्षमता होती, असं कौतुकही पुस्तकातून करण्यात आलं. मात्र, सोबतच शरद पवार यांच्यातील राजकारण्यानं त्यांचा स्वभाव आणि वागणं या सगळ्यावर मात केल्याचंही बाळासाहेब विखे यांनी म्हटलं आहे.

3. शरद पवार यांना काँग्रेसमध्ये परत घेण्यासाठी मी प्रयत्न केला

“शरद पवार यांना काँग्रेसमध्ये परत घेण्यासाठी मी प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट विखे यांनी केलाय. 1980 मध्ये इंदिरा गांधी यांची वाढती लोकप्रियता पाहून अनेक नेते पक्षात परतत होते. शंकरराव कोल्हे आणि मधुकर पिचड यांना मी घेऊन गेलो. इंदिराजींच्या घरी त्यांचा पक्षप्रवेश नक्की झाला. त्यावेळी पिचड पवार यांच्या विरोधात सारखी गरळ ओकत होते.”

“याच काळात अनेकदा यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित होत नव्हता. प्रत्येकजण राजकीय सुरक्षितता शोधत होता. तीन महिने लोटल्यावर शरद पवारांनी पुन्हा पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणून मी इंदिरा गांधी यांना पुन्हा भेटलो. त्यावेळी इंदिराजींनी ‘छोड दो ना अभी, बार बार मिलना अच्छा नही लगता’ असे म्हणत पक्ष प्रवेशाला नकारच दाखवला,” असाही प्रसंग बाळासाहेब विखे यांनी मांडला आहे.

4. राजकीय आकस मनात ठेवून प्रवरा कारखान्याचे 12 वर्षांचे ऑडिट

बाळासाहेब विखे यांनी शरद पवार पहिल्यादा मुख्यमंत्री झाले तो किस्साही सांगितला आहे. “1978 मध्ये शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर मी शंकरराव चव्हाण यांच्या बरोबर होतो. हा आकस मनात ठेवून त्यांनी माझ्या प्रवरा कारखान्याचे 12 वर्षांचे ऑडिट सुरु केले. माणूस विचारांनी कितीही मोठा असला, तरी राजकीय स्पर्धेत लहान होतो हेच पवारांनी दाखवून दिले. ऑडिट करुनही काही निष्पन्न न झाल्याने 1988 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर असाच प्रयत्न करुन पाहिला, मात्र तेव्हाही काही गैर सापडले नाही.”

5. “माझ्यावर असणारा राग पवारांनी आरोग्याचा लाभ घेणाऱ्या गरजूंवर काढला”

“प्रवरा ग्रामीण रुग्णालयाला सरकारचं अनुदान मिळत होतं. ते तुटपुंजं असलं तरी सरकारी नियमानुसार मिळत होतं. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी 1988 मध्ये हे अनुदान बंद केलं. माझ्यावर असणारा राग त्यांनी आरोग्याचा लाभ घेणाऱ्या गरजूंवर काढावा हे गैर होतं. ते अधिक वेदना देणारं होतं.”

6. मनोहर जोशी शरद पवारांच्या डावपेचातून मुख्यमंत्री

मनोहर जोशी आणि शरद पवार यांचे मैत्रीपूर्ण संबंध जगजाहीर आहेत. खरंतर युती सरकारच्या काळात सुधीर जोशी मुख्यमंत्री होणार होते, पण मनोहर जोशींनी शरद पवारांच्या मदतीने बरोबर जमवले. त्यांचे डावपेच त्यांनाच माहिती. मी काँग्रेसमध्ये असताना मनोहर जोशी यांनी मलाही सल्ला दिला. शरद पवारांशी कशाला भांडायचं, राजकारणात कशासाठी व्यक्तिगत शत्रुत्व मानायचं? तुम्हीही जुळवून घ्या. मात्र, मी फक्त बघू असं एवढंच उत्तर दिलं.

राधाकृष्ण विखे सेनेकडून उभे असताना मला हे रहस्य समजलं. राधाकृष्णच्या विरोधात धनंजय गाडेकर यांनी बंडखोरी केली. ती करण्यामागे खुद्द मनोहर जोशींचाच हात होता. त्यानंतर मी राधाकृष्णला सावध केलं.

7. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यावर राधाकृष्ण विखेंना गळ, परिस्थितीच्या रेट्यानं माझाही शिवसेना प्रवेश

“मी काँग्रेस पक्षातून निलंबित असल्यानं पक्षाचं वलय माझ्यामागे नव्हतं. अपक्ष राहून सक्रिय राजकरण अवघड आहे हे सुद्धा समजून येत होतं. 1995 मध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यावर राधाकृष्ण विखे काँग्रेसचे आमदार असताना ते मला शिवसेनेत येण्याची गळ घालू लागले. त्याला आकर्षक पद देण्याचंही मान्य केलं. तेव्हा राधाकृष्णला ती ऑफर आकर्षक वाटली आणि तो शिवसेनेत गेला. पोट निवडणुकीत विजय मिळवून मंत्रीही झाला. राधाकृष्णचं सेनेत जाणं कितपत योग्य याबद्दल मी साशंकच होतो. मात्र, मुलगा सेनेत आणि बाप सेनेपासून दूर हे बापलेकांच नाटक अशी चर्चा सुरु झाली आणि परिस्थितीच्या रेट्याखाली मला सेनेत जावंच लागलं.”

“प्रवेश घेण्या अगोदर मी बाळासाहेब ठाकरेंशी चर्चा केली. माझी राजकीय विचारधारा भिन्न असल्याचा मुद्दाही सांगितला. त्यावेळी बाळासाहेबांनी तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार काम करा. आम्ही तुम्हाला अडवणार नाही असं सांगितलं. त्यानंतर माझा सेना प्रवेश निश्चित झाला,” असंही विखे यांनी म्हटलं आहे.

8. सेनेत माझी लोकप्रियता वाढल्यानं मनोहर जोशी आणि इतरांना खटकू लागलं

“2003 मध्ये शिर्डीत विजया दशमीच्या दिवशी सेनेच महाअधिवेशन घेण्याचा निर्णय झाला. त्यावेळी मी सेनेत मंत्री होतो. अधिवेशन सुद्धा न भूतो न भविष्यती असं झालं. प्रथमच सेनेच्या वचननाम्यात ग्रामीण भागातील प्रश्न आले. बाळासाहेब विखेमुळे हे फार चांगलं झालं, अशाही प्रतिक्रिया येऊ लागल्या. मात्र तिथेच माशी शिंकली असावी.

विखे लिहितात, “शिर्डीच्या अधिवेशनानंतर मनोहर जोशी आणि अन्य काही नेते अस्वस्थ झाल्याचं मला जाणवलं. सेनेत विखे पाटलांची लोकप्रियता वाढतेय हे अनेकांना खटकू लागले. दिल्लीच्या एका बैठकीत तर मनोहर जोशींनी घोषणा करण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले? असाच प्रश्न विचारला. हाच मुद्दा सेना प्रमुखांच्या समोरही मांडला आणि वर्षभरात मे 2003 मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा आदेश आला. मी मागचा पुढचा विचार न करता राजीनामा पंतप्रधानाकडे पाठवून दिला.”

9. शिवसेनेच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर वाजपेयींकडून ऑफर

“मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी आणि व्यंकय्या नायडू यांनी राजीनामा न देण्याचा सल्ला दिला. भाजपकडून मंत्रिपद देण्याची तयारीही दर्शवली. मात्र, मी त्यास नकार दिला. त्यावेळी सेनेने काढायचं आणि भाजपने घ्यायचं हे योग्य नाही. तुमचा एकोपा माझ्यामुळे तुटावा अशी माझी इच्छा नाही, असं मी स्पष्ट सांगितलं.”

10. काही महाभागांनी राजीव गांधी यांचे कान भरले

“1989 मध्ये काँग्रेस पक्षाला निवडणुकीत फटका बसला. त्यामुळे पक्षाच्या स्थितीबद्दल मी अस्वस्थ होतो. माझ्यासह अनेक खासदार अस्वस्थ असल्याचं बोलण्यातून समजलं. पक्षांतर्गत विचारमंथन करण्यासाठी मी पुढाकार घेऊन फोरम फॉर अॅक्शन या गटाची स्थापना केली. मात्र राजीवजींचे सल्लागार म्हणवणाऱ्या आणि सामाजिक जाणिवेचा अभाव असणाऱ्या काही महाभागांनी राजीव गांधी यांचे कान भरले. मी त्यांच्याविराधात असल्याचं त्यांना सांगितलं. सोनिया गांधी यांना मी याबाबत आधीच सांगितलं होतं. मी कुठल्या गटातटात नाही हे सुद्धा स्पष्ट केलं होतं.”

बाळासाहेब विखेंनी आपल्या आत्मचरित्रात प्रवरा साखर कारखान्याची उभारणी आणि अण्णासाहेब शिंदे यांचा सहभाग यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “काही जणांनी लिहिलंय की प्रवरा साखर कारखाना उभारणीत अण्णासाहेब शिंदे यांनी पुढाकार घेतला. मात्र, कारखान्याचा पहिला गळीत हंगाम झाल्यावर ते सभासद बनले याचा इतिहास त्यांना माहीत नसावा.”

संबंधित बातम्या :

पवारांमुळे सत्तेसाठी आणि सत्तेपुरत्या राजकारणाची सुरुवात, विखेंच्या आत्मचरित्रात सणसणीत आरोप

Balasaheb Vikhe Patil Autobiography : बाळासाहेब विखे पाटील यांचं सर्वच क्षेत्रातील योगदान वाखाणण्यासारखं : पंतप्रधान मोदी

बाळासाहेब विखे तत्त्वाने वागले, सत्तेसाठी तडजोड केली नाही : राधाकृष्ण विखे-पाटील

पंतप्रधान मोदींकडून आज बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्राचे प्रकाशन; राजकीय वर्तुळाला उत्सुकता

संबंधित व्हिडीओ :

Balasaheb Vikhe write 10 big claims in his autobiography Deh Vechava Karani including attempts of murder