नवी दिल्लीः देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी (Vice Presidential Election) आज मतदान पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. संसद भवनातीन मतदान केंद्रावर (Voting booth) आज राज्यसभा आणि लोकसभेतील सर्व खासदार या निवडणुकीत मतदानासाठी येत आहेत. सकाळी 10 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून सव्वा दहा वाजेच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदभवनात हजेरी लावली. मतदान केंद्रावर जात त्यांनी या निवडणुकीसाठी मतदान केलं. त्यानंतर संसद भवनात विविध राज्यांतील खासदार मतदानासाठी रांगेत उभे राहिल्याचे चित्र दिसून आले. एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड आणि काँग्रेसकडून मार्गारेट अल्वा या दोघांमध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. आकड्यांचे गणित पाहता, जगदीप धनखड यांना जास्त मते मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती निवडणुकांप्रमाणेच ही निवडणूक देखील औपचारिक ठरणार असे म्हटले जात आहे.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला होता. मात्र उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने मार्गारेट अल्वा यांना समर्थन देण्याचं जाहीर केलं आहे. तरीही शिवसेनेचे 13 खासदारांचं एकनाथ शिंदे यांना समर्थन असल्याने पक्षाची बहुतांश मतं भाजप उमेदवार जगदीप धनखड यांना पडतील. त्यातच शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत हे सध्या ईडीच्या कोठडीत असल्यामुळे तेदेखील उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला गैरहजर राहणार आहेत.
#VicePresidentialElections2022 | Voting for the Vice Presidential election begins.
Prime Minister @narendramodi also arrived in the polling station set up inside the Parliament and exercised his right to vote.Watch Live – https://t.co/YfEtaIcgD7 pic.twitter.com/dqWjpeglrO
— DD News (@DDNewslive) August 6, 2022
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उभे असलेले दोन्ही नेते सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत. दोन्ही उमेदवार नावाजलेले वकील आहेत. जगदीप धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. भाजपचे उमेदवार जगदीप धनखड यांना भाजप, जदयू, बीजद, वायएसआरपी, बसपा, टीडीपी, अकाली दल, शिवसेना-शिंदे गट या पक्षांचे खासदार मतदान करतील.
मार्गारेट अल्वा यांनीही पाच वेळा खासदारकी भूषवली आहे. विरोधी पक्षांकडून मार्गारेट अल्वा यांना काँग्रेस, डीएमके, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, जेएमएम, टीआरस, आप हे पक्ष मतदान करतील.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी 780 खासदार मतदान करतील. निवडणुकीत विजयी होण्यासाठी 391 ही मॅजिक फिगर आहे. भाजपच्याच खासदारांची संख्या 394 आहे. भाजपला पाठिंबा देणाऱ्या पक्षांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे उपराष्ट्रपतीपदाचा निकाल पूर्णपणे जगदीप धनखड यांच्या बाजूने लागणार आहे.
आज सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत उपराष्ट्रपती पदासाठीचे मतदान पार पडेल. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल. संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत निवडणुकीचा निकाल हाती येईल.