नागपूर: राज्यात भाजप आणि शिंदे गटाचं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाच्या मागणीने जोर धरला आहे. विदर्भ राज्य आंदोलन समिती या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. या समितीने आता थेट विदर्भातील खासदारांनाच घेरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्यासह विदर्भातील दहा खासदारांचे ही समिती राजीनामे मागणार आहेत. या खासदारांच्या घर आणि कार्यालयाबाहेर जाऊन समितीच्यावतीने राजीनामे मागितले जाणार आहेत.
विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून विदर्भातील खासदारांनाच घेरण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भातील दहाही खासदारांनी विदर्भ स्वतंत्र होण्यासाठी काहीच प्रयत्न केला नसल्याची या समितीची भावना झाली आहे. त्यामुळेच या समितीने दहाही खासदारांचा राजीनामा मागण्याचा निर्णय घेतला आहे.
आज दुपारी 12 वाजता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाबाहेर जाऊन विदर्भ राज्य आंदोलन समिती राजीनामा मागणार आहे. तसेच खासदार कृपाल तुमाने यांच्या कार्यालयाबाहेरही आंदोलन करत त्यांच्याही खासदारकीचा राजीनामा मागितला जाणार आहे. विदर्भातील दहाही खासदारांच्या कार्यालयाबाहेर जाऊन त्यांचा राजीनामा मागितला जाणार आहे. दिवसभर हा कार्यक्रम असणार आहे.
खासदारांच्या राजीनाम्यासाठी संपूर्ण विदर्भात आंदोलन होणार आहे. चंद्रपुरात वामनराव चटप, नागपुरात अरुण केदार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे विदर्भातील खासदार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दोन वर्षानंतर म्हणजे 2024मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यापूर्वीच विदर्भवाद्यांनी आता विदर्भातील खासदारांना घेरण्यास सुरुवात केल्याने या खासदारांची डोकेदुखी वाढणार आहे. खासकरून विदर्भाच्या मुद्द्यावरून भाजपची मोठी कोंडी होणार आहे.
भाजपने स्वतंत्र विदर्भ करण्याच्या मुद्द्यावरच निवडणुका लढवल्या होत्या. मात्र, दोनदा सत्तेत येऊनही विदर्भ स्वतंत्र करण्यासाठी भाजपने काहीच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे विदर्भवादी नेते भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे आता विदर्भवाद्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसल्याने भाजपची डोकेदुखी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.