सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) हे आपली भाषणशैली आणि विरोधकांना खोचक शब्दात प्रत्युत्तर देण्यासाठी ओळखले जातात. आता सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटकपक्ष असलेल्या काँग्रेसवर मिश्किल टिप्पणी केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह घड्याळ आहे. मात्र, शिवसेना आणि हाताच्या नादी लागल्यापासून घडाळ्याची वेळ चुकत आहे, असं जयंत पाटील म्हणाले. त्याचं झालं असं की या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) काहीसे उशिरा पोहोचले, त्यामुळे कार्यक्रमालाही काहीसा उशीर झाला. त्यावरुन जयंत पाटील यांनी वरील टिप्पणी केलीय.
स्वर्गीय गुलाबराव पाटील प्रतिष्ठान आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जयंत पाटील यांनाही या कार्यक्रमाला पोहोचण्यासाठई काहीसा उशीर झाला. त्यामुळे भाषणाला उभं राहिल्यानंतर त्यांनी उपस्थित लोकांची माफी मागितली. राज्यमंत्री विश्वजित कदम याची वाट पाहत बसावं लागलं आणि कार्यक्रम सुरु होण्यास वेळ लागला, असं जयंत पाटील म्हणाले. तसंच शिवसेना आणि हाताच्या नादी लागल्यापासून घडाळ्याची वेळ चुकत आहे, असं मिश्किल वक्तव्यही त्यांनी केलं. हे वक्तव्य केल्यानंतर उपस्थित माध्यम प्रतिनिधींना हे लगेच छापू नका, असंही पाटील म्हणाले. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.
दरम्यान, धनुष्यबाण, घड्याळ आणि हात एकत्रित आल्यापासून या जिल्ह्यात सहकार क्षेत्रात चांगली ताकद निर्माण झाली आहे. लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
इतर बातम्या :