पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज पुणे दौऱ्यावर होते. पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) परिसरात असताना सोमय्या यांना काही शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच त्यांना धक्काबुक्कीचाही प्रयत्न झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. महत्वाची बाब म्हणजे शिवसैनिकांनी अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करताच सुरक्षा रक्षक सोमय्यांना तिथून घेऊन निघाले. त्या गोंधळात सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळ्याचं एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोमय्या यांना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये काही शिवसैनिक सोमय्या यांच्या अंगावर धावून जाताना दिसून येत आहेत. काहीजण गाडीसमोर आडवे पडून सोमय्या यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. तर एक व्यक्ती सोमय्या यांच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे. महत्वाची बाब म्हणजे एक महिला सोमय्या यांच्या गाडीवर चप्पल फेकत असल्याचंही एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावरील हा हल्ला ठरवून केला गेला का? असा सवाल आता भाजपकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, आपल्यावर शिवसेनेच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप सोमय्या यांनी ट्विटरद्वारे केला आहे. सोमय्या यांना सध्या संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच पुणे भाजप शहराध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे काही काळ रुग्णालयातही मोठा तणाव पाहायला मिळाला.
I am attacked by Shivsena Gundas inside the premises of Pune Mahapalika@BJP4India @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 5, 2022
दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. सरकार तुमचं आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी तुमची आहे. जर सोमय्या आरोप करत असतील तर ते खोटे आहेत हे सिद्ध करुन दाखवा, घोषणाबाजी आणि अंगावर धावून काय येता? असा खोचक सवाल पाटील यांनी केलाय.
इतर बातम्या :