उस्मानाबाद : राज्याचं कुलदैवत असलेल्या तुळजाभवानीकडे (TuljaBhavani) सर्वसामान्यांपासून ते बड्या नेतेमंडळींपर्यंत सर्वचजण आपल्या मनातलं मागणं मागतात. त्याला भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडेही (Pankaja Munde) अपवाद ठरल्या नाहीत. पंकजा मुंडे आज उस्मानाबाद (Osmanabad) जिल्हा दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. तसंच आपल्या मनातील इच्छाही त्यांनी देवीकडे व्यक्त केली. मनातील इच्छा बोलून दाखवल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या चेहऱ्यावर हसू उमटल्याचंही पाहायला मिळालं! यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी च्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले.#तुळजाभवानी pic.twitter.com/vRYyCTni3q
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 7, 2022
पंकजा मुंडे यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. त्यानंतर मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या चिंतामणी दगडावर दोन्ही हात ठेवून त्यांनी मनातील इच्छा बोलून दाखवली. आपली इच्छा पूर्ण होणार की याचा कौल त्यांनी घेतला. त्यावेळी दगड उजव्या बाजूला फिरला आणि पंकजा यांना होकारार्थी कौल मिळाला! त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. यावेळी देवीकडे मागणं मागितलं असं विचारल्यानंतर त्यांनी ते गुपित ठेवणंच पसंत केलं. (चिंतामणी दगडावर हात ठेवून मनातील इच्छा बोलून दाखवल्यानंतर तो दगड उजवीकडे किंवा डावीकडे फिरतो. दगड उजवीकडे फिरल्यास तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होते. तर दगड डावीकडे फिरला तर तुमची इच्छा पूर्ण होत नाही, असं बोललं जातं.)
पंकजा मुंडेंनी तुळजाभवानीकडे मागितला कौल! तुळजाभवानी मंदिरामागील चिंतामणी दगडावर हात ठेवून पंकजा मुंडे यांनी मनातील इच्छा सांगितली. पण पंकजाताईंनी तुळजाभावनीकडे नेमकं काय मागितलं? @Pankajamunde @BJP4Maharashtra #PankajaMunde #Tuljabhavani #Tuljapur pic.twitter.com/FmhrAvdvBi
— Sagar P. Joshi (@spjoshi11) April 7, 2022
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनीच त्यांचा पराभव केला. त्यानंतर पंकजा मुंडे यांना भाजपकडून राष्ट्रीय पातळीवर मोठं पद देण्यात आलं. मात्र, पंकजा मुंडे आमदार कधी होणार? असा प्रश्न त्यांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जातो. त्याबाबत खुद्द पंकजा यांनाच विचारलं असता विधान परिषदेच्या रिक्त होऊ घातलेल्या जागेवर आमदारकीबाबत पक्षाने आपल्याबरोबर काही चर्चा केली नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी पंकजा यांच्या चेहऱ्यावरील नाराजीचे भाव स्पष्ट जाणवत होते.
इतर बातम्या :