मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील संघर्ष सातत्याने पाहायला मिळतोय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा संघर्ष पुन्हा एकदा दिसून आला. सत्ताधाऱ्यांच्या गोंधळात राज्यपाल अभिभाषण अर्धवट सोडत निघून गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांच्यावर जोरदार टोलेबाजी केलीय. ‘भगतसिंह कोश्यारी यांच्यासारखे कर्तृत्ववान राज्यपाल पाहिले नाहीत. केंद्र सरकार घसरून कोणत्या पातळीवर जात आहे याचं उदाहरण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे, अशी टीका पवारांनी केलीय.
राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका करताना पवार म्हणाले की, हल्लीच्या राज्यपालांवर न बोललेलं बरं. केंद्र सरकार कोणत्या पातळीवर जात आहे हे महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. राज्य मंत्रिमंडळाला विधान परिषदेवर सभासद नेमण्याचा अधिकार आहे. मात्र, वर्ष होऊन गेलं तरी 12 आमदारांच्या बाबतीत निर्णय घेतला जात नाही. याचा अर्थ काय? असा सवाल पवारांनी केलाय. ज्या पदाची प्रतिष्ठा महाराष्ट्रात अनेकांनी सांभाळली, ती आम्ही ठेवणारच नाही हा निर्धार ठेवून कुणी काम करत असेल तर त्यावर भाष्य न केलेलं बरं. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनीही याचा विचार केला पाहिजे, असेंही पवार म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांनी राज्यपालांवर केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. ‘मला असं वाटतं की जाणीवपूर्वक असंविधानिक कृती करायच्या आणि राज्यपालांविरोधात बोलायचं. एकप्रकारे वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न हा सातत्याने सुरु आहेय. पण मला असं वाटतं की राज्यपाल हे एका संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे. ते संविधानानेच काम करतात. त्यामुळे अशाप्रकारे त्यांना टार्गेट करणं हे अतिशय अयोग्य आहे’, अशा शब्दात फडणवीसांनी शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिलंय.
इतर बातम्या :