मुंबई : केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरचा (Jammu Kashmir) अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. सोमवारी या अर्थसंकल्पावरील चर्चेत खासदार सुप्रिया सुळेही (Supriya Sule) सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केलं. सुळे यांनी धर कुटुंबियांकडून चालवण्यात येणाऱ्या दिल्ली पब्लिक स्कूलचं उदाहरण देत त्या इतिहासात अडकण्यापेक्षा आपण नव्या उपाययोजना कराव्या असा सल्ला केंद्र सरकारला दिला. मात्र, यावेळी बोलताना सुप्रिया सुळे आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. आई-बाप काढायचे नाहीत, अशा शब्दात सुळे यांनी सिंह यांना भर लोकसभेत सुनावल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
काश्मिरी पंडितांच्या मुद्दा आणि शैक्षणिक धोरणावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. जम्मू-काश्मीरमध्ये 5 हजार मुलांच्या शिक्षणाची काळजी घेणाऱ्या दिल्ली पब्लिक स्कुलला नोटीसा पाठवल्या जात आहेत. त्यांना त्रास दिला जातोय, असा आरोप सुळे यांनी केला. अशा नोटीस पाठवून तुम्ही तिथल्या मुलांचं भलं करत आहात का? किती दिवस आपण इतिहासात अडकून बसणार? मागील 60 वर्षांत जे घडलं ते घडलं, पण पुढची किती वर्षे तुम्ही तेच बोलणार आहात. तेच ते ऐकून आता कंटाळा आला आहे. आता इतिहासात न अडकता भविष्याचा विचार करायला हवा, असा सल्लाच सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला दिलाय.
Hon.@supriya_sule Tai spoke during the general discussion on Budget 2022-23 of UT of Jammu & Kashmir in Lok Sabha today. She raised following points:
She suggested giving more time to study the J&K Budget, so that an extensive debate can be done. https://t.co/95emN0Wtaj
— NCP in Parliament (@NCP_Parliament) March 14, 2022
इतकंच नाही तर काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुनही त्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. जितेंद्र सिंह यांनी आपल्या भाषणात काश्मिरी पंडितांचा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा जितेंद्र सिंह यांनी किती हॉटेल्स तिथे बांधले? काय सुविधा दिल्या? अशी विचारला केली. दरम्यान, आपल्या भाषणाचा उल्लेख आल्यानंतर जितेंद्र सिंह यांनी सुळे यांना रोखत ‘आई-वडिलांनी आमच्यासाठी काय केलं हे आम्ही सांगणार नाही, असं त्यांना बोलताना मी ऐकलं होतं. सांगायचं नसेल तर नका सांगू पण तुमच्या आई-वडिलांमुळेच तुम्ही इतक्या सक्षम झालात आणि आज संसदेत उभ्या आहात. इतरांकडून आपल्याला काय मिळालं ते आपण विसरु शकत नाहीत. तुम्हीही तुमच्या आई-वडिलांमुळेच इथे आहात’, असं उत्तर दिलं.
सिंह यांच्या या वक्तव्यानंतर सुळे काहीशा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ‘मी घराणेशाहीवर काही बोलले नाही. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, मग आमची काय अडचण आहे? असा सवाल त्यांनी केला. तसंच आई-वडिल सोडून काहीही बोलावं. आई-बाप काढायचे नाहीत’, अशा शब्दात सुळे यांनी सिंह यांना उत्तर दिलं. माझ्या पालकांचा मला अभिमान आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या. त्यावर जितेंद्र सिंह यांनी मी पर्सनल बोललो नाही. तर वारसा विसरणं शक्य नाही. मग तो देशाचा असो किंवा समाजाचा असं आपण बोलल्याचं सांगत बाजू सावरली.
इतर बातम्या :