मुंबई: मोदी सरकारने शुक्रवारी यंदाचं अंतरिम बजेट सादर केलं. बजेटनंतर अनेक महिला खासदारांनी एकत्र जेवण केलं. विविध पक्षाच्या महिला खासदार यावेळी एकत्र पाहायला मिळाल्या. जेवणानंतर थोडासा विरंगुळा म्हणून या महिला खासदारांनी पारंपारिक खेळाचा आनंद लुटला.
केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार हरसिमरत कौर बादल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल, भाजप खासदार किरण खेर, द्रमुक खासदार कणीमोझी, केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल या सर्वजणी मिळून एकमेकींचा हात पकडून गिद्दा खेळताना दिसल्या.
यानंतर स्मृती इराणी आणि हरसिमरत कौर बादल यांनी फुगडीही खेळली. हरसिमरत कौर बादल यांनी हा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर केला आहे.
“आयुष्याने आमच्यावर काल दुपारी जादू केली, दुपारच्या नियमित जेवणानंतर एक वेळ आली, तिने आम्हाला बालपणीची आठवण करुन दिली” असं हरसिमरत कौर यांनी म्हटलं
राजकीय नेते एकमेकांच्या विरोधात राजकारण करत असले तरी राजकारणापलिकडचेही संबंध असू शकतात, हे या व्हिडीओवरुन पुन्हा एकदा दिसून येतं. शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला. आज दुपारपर्यंत हा व्हिडीओ ट्विटरवर जवळपास 68 हजार लोकांनी पाहिला.
Life worked its magic on us yesterday afternoon, when a routine lunch became a trip to childhood. @smritiirani @KirronKherBJP @AnupriyaSPatel @KanimozhiDMK @supriya_sule pic.twitter.com/PEyJMEzL7r
— Harsimrat Kaur Badal (@HarsimratBadal_) February 1, 2019